अशी विदेशी फळं ज्यांबद्दल वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल…

जगभरात विविध फळांची लागवड केली जाते. यांतील काही फळे ही त्या-त्या वातावरणाला पोषक असतात, तर काही फळे कृत्रिम वैज्ञानिक पद्धतीने वाढवली जातात. वेगवेगऴया देशांत, वेगवेगळया खंडात अशा प्रकारचे वैविध्य पाहायला मिळते. हे वैविध्य अर्थातच तेथील हवामान, मृदा, जलस्त्रोत यांवर अवलंबून असते. काही फळे तर इतकी दुर्मिळ असतात की त्या फळांचा आस्वाद घेणं आपल्या आवाक्याबाहेरचं असते. तरीही विशिष्ट रंग, चव, पोषणमूल्ये असलेल्या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशाच जगभरातील काही फळांची आपण माहिती करुन घेऊ…

 

१. ल्युकूमा फळ (Lucuma Fruit): पेरु या देशात राहणा-या लोकांना हे फळ तसं नवीन नाही. मोठ्या प्रमाणात या फळाची लागवड या देशात केली जाते. हे फळ चवीला गोड असते पण चवीपेक्षा सुगंध जास्त पसंत पडत असल्याने मोठ्या प्रमाणात याचा वापर विविध पदार्थांत केला जातो. केक, पेस्ट्री, पुडींग, आईस्क्रिम अशा पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी व त्यांना एक विशिष्ट गंध देण्यासाठी हे फळ वापरले जाते.

२. पॅके फळ (Pacay Fruit): लांबसर, शेंगेसारखं चवीला गोड असलेलं हे फळ अतिशय महाग असते. पेरु देशातील कस्कोमध्ये या फळाला मोठी मागणी आहे. काळया रंगाच्या बिया व सफेद रंगाचा मऊसर, गोड खाण्यायोग्य भाग असलेल्या फळाची एक शेंग जवळपास दिड हजार रुपयांना मिळते.

 

३. कॅयोट फळ (Chayote Fruit): आपल्याकडच्या हिरव्यागार पेरुंसारखा रंग व आकार असलेले हे फळ कलिंगड व काकडीच्या वर्गात मोडते. मेक्सिकोमध्ये या फळाची लागवड केली जाते. लिंबाच्या रसाने मॅरिनेट करुन या फळाचा उपयोग वेगवेगळे सलाद/कोशिंबीर बनवण्यासाठी करण्यात येतो. या फळाची साल ही पोषणद्रव्यांनी युक्त असते त्यामुळे हे फळ सालीसकट खाण्यास पसंती दर्शवली जाते.

४. फुयू पर्सिमॉन (Fuyu persimmon): या फळांना ‘देवाची फळे’ असं संबोधलं जाते आणि त्याचा उल्लेख ऐतिहासिक गोष्टींमध्येही केलेला आहे. या फळाची चव ही गोड असते व परिपक्व फळाचा रंग हा नारंगी असतो. यामध्ये बी आढळत नाही. जपानमध्ये हे फळ अतिशय प्रसिद्ध असून त्याचा वापर विविध पदार्थ बनवताना केला जातो.

५. डुरियन फळ (Durian Fruit): बाहेरुन काटेरी, हिरव्या रंगाचे असणारे हे फळ पिकल्यावर अतिशय चविष्ट लागते. आतील गराचा भाग हा खाण्यायोग्य असतो. परंतु हे फळ अतिशय उग्र वासाचे असल्याने काही लोकांना असह्य वाटून ते हे फळ न खाणेच पसंत करतात. साधारणपणे खराब झालेल्या कांद्यासारखा वास या फळाला असतो.

६. पोमेलो फळ (Pomelo Fruit): संत्र्याच्या वर्गातील हे फळ मुख्यत्वेकरुन दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळते. परिपक्व झाल्यावर हे फळ पिवळसर रंगाचे दिसते व त्यातील सफेद मांसल भाग हा खाण्यायोग्य असतो. पिकलेल्या द्राक्षांसारखी चव असलेलं हे फळ अतिशय प्रसिद्ध आहे.

७. बुद्धांचा हात (Budhha’a Hand): नावाप्रमाणेच या फळाचा आकार हाताचा तळवा व बोटांप्रमाणे असतो. या फळाचा रंग नारंगी असून त्याचा वापर गोड पदार्थ बनवताना केला जातो. जपान, चीन, कोरिया, भारतातील काही विभागांमध्ये हे फळ आढळते.

©Nikita Patharkar

admin

admin