झाशीची राणी ज्या मुलाला पाठीशी बांधून लढली त्या मुलाचे पुढे काय झाले वाचा सविस्तर !

0

‘बुंदेले हर बोलो के मुॅह हमने सुनी कहानी थी. खुब लडी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी.. झाशीची राणी म्हटली, की लढाऊ पोशाखात हातात समशेर, पाठीवर बाळ बांधुन अश्वारुढ अशी तिची मुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. झाशीच्या राणीने वीरांगना होऊन दिलेला लढा ते तिच्या वीरमरणापर्यंतचा सारा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. परंतु

या इतिहासातही सर्वांचे लक्ष वेधुन घेणार्या त्या तिच्या पाठीवरल्या बाळाचे पुढे काय झाले तरी काय.. ? हा प्रश्न मात्र सार्यांनाच पडत असेल .याचं उत्तर शोधताना, प्रथम थोडा पुर्व इतिहासही जाणुन घ्यायला हवा.. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे,सार्या भारताला अभिमान वाटावा असं व्यक्तीमत्व.भारताचा अभिमान.अठराशे सत्तावन्नच्या स्वतंत्र्यसंग्रामात तिने इंग्रजांशी दिलेल्या लढ्याचा इतिहास तर सर्वांना माहीतच आहे.

पेशव्यांचे कारकुन मोरोपंत तांब्यांची मनिकर्णिका, झाशी संस्थानचे राजे गंगाधरपंत नेवाळकर यांच्याशी विवाहबध्द होऊन ,राणी लक्ष्मीबाई झाली.आपल्या तीन महिन्याच्या बाळाच्या मृत्युसह आपल्या पतिच्या मृत्युचे दुःखही पचवून धीराने उभी राहिली.धिरोदात्त अशा या लक्ष्मीबाईने पतिच्या माघारी आपल्या दत्तक मुलाला राजगादीवर पहात स्वतः राज्यकारभार हाती घेतला.

जेव्हा ब्रिटीश गव्हर्नर लाॅर्ड डलहौसीने दत्तक विधान रद्द करुन झाशी संस्थान खालसा केले,तेव्हा या अन्यायाविरुध्द आपल्या हक्कासाठी झाशीच्या राणीने लढा पुकारला.मदमस्त ब्रिटीश सत्ते विरुध्द आपल्या दत्तक मुलाला पाठिशी बांधुन घोड्यावर स्वार होऊन ही रणरागिणी स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरली.वीरत्वाने शेवटच्या श्वासापर्यंत लढता लढता ग्वल्हेरच्या रणांगणावर तिला वीरमरण प्राप्त झाले.

ती धारातिर्थी पडल्यावर ज्या मुलाच्या हक्कासाठी तिने प्राणाची आहुती दिली त्याचे पुढे झाले तरी काय..? हे तर आपण पहाणारच आहोत, परंतु तो दत्तकपुत्र कोणत्या घराण्यातुन घेण्यात आला होता हेही जरा पाहु. झाशीचे राजे गंगाधरपंतांनी आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर नात्यातल्या वासुदेव नेवाळकर यांच्या मुलाला आनंदरावला दत्तक घेतले.आणि त्याचे नविन नामकरण दामोदरराव असे केले.

त्याचा जन्म अठराशे एकोणपन्नास साली झाला होता.झाशीच्या राणीच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी तो आठ नऊ वर्षाचा असावा.ग्वाल्हेरच्या लढाईत राणीला हौतात्म्य प्राप्त झालं, पण हा दत्तकपुत्र दामोदरराव वाचला.झाशीच्या राणीच्या चाकरीमधिल विश्वासु काशीबाई हिच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात आली.त्याला तीन दिवस ग्वल्हेरमधेच लपविण्यात आले.

जंगलामधेच लपत छपत बुंदेलखंडच्या दिशेने जाताना त्यांना इंग्रजांच्या भितीने कुणी आसराही देत नव्हते. वेदवती नदीच्या काठाजवळ एका गुहेत झाशीच्या सैनिकांनी दामोदररावला लपविले.जवळचे पैसे संपले.खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली.शेवटी झाशीच्या राणीची शेवटची आठवण असलेल्या दामोदररावच्या हातातील बत्तीस तोळ्याचे सोन्याचे कडेही त्यांना विकावे लागले.महिनों महिने नीट अन्नपाणी नसल्यामुळे दामोदररावाची तब्येत खालावु लागली.

झाशीच्या या वारसाचे प्राण वाचवण्यासाठी अखेर नानेखान रिसालदारांने इंग्रजांसमवेत मध्यस्थी केली.माउंट प्लींक नावाचा एक इंग्रज अधिकारी त्यांच्या विश्वासातला होता. नानेखानने दामोदररावाचा जीव वाचिण्यासाठी अक्षरशः त्याला गळ घातली.त्यावर दामोदररावला वार्षिक दहा हजार रपयांची पेन्शन मंजुर करण्यात आली.त्याच्या इंग्रजी,उर्दू आणि मराठी शिक्षणाचीही सोय करण्यात आली.

तो इंदौरमध्ये राहू लागला.योग्य वयात आल्यावर त्याच्या सख्ख्या आईने त्याचे लग्न लाऊन दिले,पण त्याच्या बायकोचे अकाली निधन झाले.त्यानंतर त्याचा पुन्हा विवाह झाला.त्याला लक्ष्मणराव नावाचा मुलगा झाला.कंपनीचे राज्य जाऊन इंग्लंडच्या राणीचे राज्य सुरु झाले. त्यावेळी अनेकदा आपले हक्क मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले.पण काही उपयोग झाला नाही.

झाशीच्या राजगादीच्या या वारसदाराला ब्रिटीशांच्या पेन्शनवर जगणे, नामुष्कीचे वाटू लागले.हा सल त्याला सतत आतुन खात राहिला. अठ्ठावीस मे एकोणीसशे सहा साली वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. दामोदररावाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्याच्या वारसदाराना मिळणारे मासिक दोनशे रुपयांचे पेन्शनही बंद करण्यात आले.

त्याचा मुलगा लक्ष्मणराव ज्याने आता आपले आडनाव झाशीवाले लावण्यास सुरुवात केली,तो इंदौरच्या कोर्टाबाहेर बसुन लोकांना टायपिंगची कामे करुन देत आपला उदरनिर्वाह करीत होता.कित्येक वर्षे झाशीच्या राणीचे हे वारसदार लोकांच्या विस्मरणात गेले होते.दोन हजार सात साली मोहन नेपाळी या इतिहास संशोधकांने त्यांना शोधुन काढले.

दोन हजार पंधरा साली झाशीच्या किल्ल्यामध्ये भरलेल्या “झाशी जन मोहोत्सव “या कार्यक्रमात झाशीच्या राणीचे पाचवे वंशज अरुण कृष्णराव झाॅसीवाले हजर होते.त्यावेळी सत्तर वर्षांचे अरुणकुमार हे मध्यप्रदेश इलेक्ट्रिसीटी बोर्डातुन निवृत्त झाले होते, तर त्यांचा मुलगा योगेश झाशीवाले हा नागपुर येथे एका साॅफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे.

आता झाशीच्या राणीच्या पाठीवरील मुलाचा हा सारा इतिहास ज्ञात झाल्यावर मात्र, झाशीच्या राणीच्या कोणत्याही पुतळ्याकडे पाहिल्यावर, पाठीवरच्या तिच्या मुलाची झालेली परवड आपल्याला नक्कीच विसरता येणार नाही..

Credit : शांभवी बोधे..✍🏼

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!