‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या कालावधीत जे काही कळत-नकळतपणे घडले त्यावर आपले स्पष्ट मत मांडण्यासाठी आणि त्या दिवसांनी माणूस म्हणून केलेल्या एकूण बदलाबद्दल अभिनेता आस्ताद काळेने लिहिले एक ओपन लेटर-

0

नमस्कार…हा नुसताच आपला एक औपचारिक नमस्कार नाही. खूप मनापासून, वाकून, पायाला स्पर्श करून केलेला नमस्कार आहे. कोणाला…?  सांगतो. बिग बॉस हा जगप्रसिद्ध कार्यक्रम मराठी भाषेत आणणाऱ्या सर्वांना. त्यासाठी माझी निवड केलेल्या सर्वांना. तो पाहिलेल्या सर्वांना.

मला खोटं वागता येत नाही. हा गुण की दोष माहिती नाही. मी पटकन एखाद्या गोष्टीवर व्यक्त होतो. बऱ्याचदा माझा मुद्दा योग्य असला, तरी पद्धत काहीशी चुकते. यामुळे या क्षेत्रातही आणि वैयक्तिक आयुष्यातही माझं कधी नुकसान झालेलं आहे. पण तरीही मी खोटं, किंवा तोंडदेखलं फार वागू शकत नाही.

इथे मी एक गोष्ट छातीठोकपणे सांगतोय, की बिग बॉसमध्ये घडलेली एकही गोष्ट ही scripted नव्हती. जे काही, जसं काही घडलं ते सगळं ज्याने-त्याने स्वत:च्या मर्जीने केलं होतं.ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, आशिर्वाद दिले, मतं दिली, त्यांचा मी निश्चितच ऋणी आहे. पण ज्यांनी मला नावं ठेवली, शिव्या दिल्या, त्यांचा मी जास्त ऋणी आहे. निंदकाचं घर शेजारी असायलाच हवं. फायदे असतात खूप.

या १०० दिवसांच्या खेळामुळे मी बराच बदललो हे मान्य करतो. स्वत:समोर आरसा धरल्यासारखं झालं. अनेक प्रश्न मला विचारले गेल्यासारखं वाटलं. त्यांची उत्तरं माझी मलाच शोधणं भाग होतं. ती सापडली आहेत असं मी म्हणणार नाही, पण प्रक्रिया नक्कीच सुरू झाली आहे, आणि सुरूच राहील. माणसांची किंमत कळली. गृहितं नाहीशी होऊ लागली. रागावर थोडाफार तरी ताबा मिळवण्याचे काही यशस्वी प्रयत्न झाले. माझाही इतका आधार वाटू शकतो कोणाला याचा आनंद, आणि त्यामुळे येणाऱ्या जबाबदारीची जाणीव, हेही झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं. माझ्या चुकांमुळे दूर गेलेले माझे मित्र मला परत मिळाले. माझी सखी, स्वप्नाली मला परत मिळाली. माझे आई-वडील मला परत मिळाले. हे सगळं ज्यांच्या ज्यांच्यामुळे झालं, त्या सर्वांना हा नमस्कार आहे.

आज पहिल्यांदाच हे सगळं लिहितोय. कारण आता “बिग बॉस”ची मोहिनी माझ्यातून पूर्णत: बाहेर पडली आहे. पुन्हा कलेच्या आणि रसिकांच्या सेवेस हजर आहे. पाठीवरचा हात काढू नका रसिकहो. तो तसाच राहू द्यावात ही विनंती.

आस्ताद काळे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!