मराठी चित्रपटसृष्टी साठी झटणार्या त्या दिग्दर्शक / कलाकारांचा ईतिहास ! नक्की वाचा

0

झपाटून एखाद्या कामाच्या मागे लागल्यावर ते काम पूर्ण होऊन त्या कामामुळे जेंव्हा’इतिहास’ घडतो तेंव्हा त्या सोनेरी क्षणांचे आपण साक्षिदार असल्याचा आनंद आयुष्यभर सुखावून जातो. ‘मराठी तारका’ या माझ्या कार्यक्रमाला यश मिळणं सुरू झालं होतं त्याच वर्षी म्हणजे 2007 ला मराठी चित्रपट सृष्टीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होणार होती त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकार, सांस्कृतिक खाते काहीतरी कार्यक्रम करतील अशी अपेक्षा होती,पण सरकारी पातळीवर काहीच हालचाल झाली नाही, आणि चित्रपटसृष्टीतील त्यावेळच्या दिगग्ज मंडळीपैकी काहीजण तरी पुढाकार घेऊन एखादा कार्यक्रम करतील असे वाटले होते. पण जिथे पैश्याची गणितं येतात तिथं कुणी पुढाकार घेत नाही.कुणीच पुढं येऊन आनंदाने एखादा कार्यक्रम करतील याची चिन्ह दिसेनात ,मग मी ठरवलं इतर कुणी काही करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच चित्रपट सृष्टीतील कलाकारांना एकत्र आणून एक कार्यक्रम करूयात.

ज्यांनी अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत राहून रोजी रोटी,नाव कमावलं अश्या काही मोठया व्यक्तींना भेटून मी माझी कल्पना सांगितली,सगळ्यांनी मला वेड्यात काढलं आणि वेग वेगळ्या स्वभावाच्या कलाकारांना एकत्र जमवताना स्वतःचा बी पी वाढवून घेण्याची एवढी कसली हौस आलीये तुला?,स्वतःच्या हातानीच स्वतःच्या का नुकसान करून घेतोस,असे माझ्या हिताचे सल्ले या लोकांनी दिले.पण माझा निर्णय ठाम होता. निळूभाऊ फुले यांना मी सगळी परिस्थिती सांगितली,त्यावर त्यांनी महेश तू एकदा ठरवलंय ना,मग तू ते करून दाखवशीलच”.असं बोलल्यामुळे माझाही उत्साह वाढला, मी तयारी सुरू केली.20 हिरो आणि 20 हिरोइन एकत्र आणून’मराठी तारे तारका’ या नावाने नृत्याचा कार्यक्रम करायचा आणि तो टीव्ही चॅनेलवर दाखवायचा असं ठरवलं.

कार्यक्रम करायचा तर भव्य दिव्य करायचा हे मनाशी पक्क केल्यामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला खर्च तर खूप येणार आणि त्यासाठी पैसे उभे करायचे कसे?सगळी कलाकार मंडळी पुण्यात येणार तर हॉटेलचा खर्च,कार्यक्रमाचा गाजावाजा चांगला झाला पाहिजे त्यासाठी पेपरमध्ये जाहिराती दिल्या पाहिजेत,मोठ मोठी होर्डिंग्ज लावली पाहिजेत, मुख्य म्हणजे कलाकारांचे मानधन.एक ना अनेक खर्च.त्यात कार्यक्रम टीव्ही चॅनेलवर दाखवून काही पैसे मिळतील असे वाटले होते पण इ टी व्ही चॅनलने फिक्स रक्कम देण्याऐवजी आम्ही कार्यक्रम टेलिकास्ट करू त्यात जाहिरातींमधून जे पैसे येतील त्यातून आधी आमचा टेक्निकल आणि इतर खर्च काढून घेऊन राहिलेली रक्कम तुम्हाला देऊ असं व्यावहारिक ,आणि त्यांच्या सोयीचं डिल माझ्याशी केलं.त्यामुळे माझी रिस्क आणखी वाढली. स्वतःचे पैसे आणि काही स्पॉन्सरशीप मधून मिळालेली रक्कम यामधूनच खर्च चालू होता.

चित्रपटसृष्टीतील ज्या ज्या कलाकारांना मी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारले त्या जवळपास सर्व कलाकारांनी डेट्स ऍडजस्ट करून मला होकार’दिला.प्रत्येकाला मी आधीच सांगितलं होतं की मराठी चित्रपटसृष्टीच्या पंचाहत्तरी निमित्ताने सर्व कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावे ह्याच हेतूने हा कार्यक्रम मी करीत असून त्यातून पैसे कमावणे हा हेतू नाही.त्यामुळे प्रत्येकाला मी फुल न फुलांची पाकळी म्हणून पाच हजार देणार आहे आणि टीव्ही चॅनेल कडून जे काही पैसे मिळतील ते सर्वांना सारख्याच प्रमाणात वाटणार. मी माझ्याकडून आधीच सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कोणत्याच कलाकाराने कुरकुर केली नाही की कसला त्रास दिला नाही.सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की “पैश्यापेक्ष्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एवढे सगळे कलाकार एकत्र येऊन,एकाच कार्यक्रमात नृत्य करू याचा आनंद आमच्यासाठी खूप आहे,आणि आम्हालाही प्रसिद्धी मिळणार आहेच”.

2007 ला आजच्या सारखे इव्हेन्ट होत न्हवते,त्यामुळे प्रत्येक कलाकार उत्साहाने आपापल्या डान्सची रिहर्सल करीत होता. कलाकारांच्या जोड्या ठरवून त्याप्रमाणे त्यांना गाणी देण्यात आली होती.वर्षा उसगावकर यांच्या सुरवातीच्या काळातील एका हिट चित्रपटात त्यांचा हिरो असलेला एक चिरतरुण अभिनयात ‘महागुरू’ असलेला हिरो, जो नंतर एका गाण्यासाठीच वर्षा उसगावकर यांच्या बरोबर जोडीनं चित्रपटात दिसला होता, नंतर ही जोडी एकत्र पाहायला मिळाली नाही त्यामुळे जर दोघांनी माझ्या कार्यक्रमात जोडीने नृत्य केले तर ह्या जोडीला प्रत्यक्ष रंगमंचावर पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल असे मला वाटले, वर्षा उसगावकर यांनी मला आधीच होकार दिला होता.

अभिनय, नृत्य, गायन अश्या अनेक बाबतीत ‘महागुरू’ असलेल्या त्या चिरतरुण कलाकाराला मी फोन करून कार्यक्रमाची माहिती दिली,पण त्यांनी वर्षा उसगावकर यांच्या बरोबर डान्स करायला नकार दिला,आणि मी जर डान्स केला तर माझ्या बायको बरोबर करिन ही अट घातली, कारण त्यांची बायकोसुद्धा अभिनेत्री असल्याने त्यांनी तिला घेणं भाग असल्याचे सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये मानधन त्यांनी मला मागितले. चिरतरुण महागुरू अभिनेत्याची डिमांड ऐकून माझ्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकले,आधी वाटलं की ते माझी ‘गम्मत जम्मत’ करत असतील.

अभिनय,नृत्य,दिग्दर्शन, गायन,अश्या सर्व गोष्टींमध्ये ‘महागुरू’ असणाऱ्या एवढ्या मोठया कलाकाराला माझ्या’छोट्या’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारून मी चूक तर केली नाही ना? त्यात त्यावेळी मी चित्रपटसृष्टीत नवीन होतो,माझं नावंही न्हवतं, त्यामुळे मी त्यांना विचारण्याचं धाडस करायला नको होतं, माझी योग्यता न्हवती अशी मी स्वतःचीच समजूत काढली आणि समीर धर्माधिकारी याला वर्षाजींच्या बरोबर जोडीनं नृत्य करायला घेतलं,वर्षा उसगावकर यांच्या बरोबर डान्स करायची संधी मिळाल्याने समीर खुश झाला.
दुसऱ्या एका गाण्यात रमेश भाटकर यांच्या बरोबर अलका कुबल डान्स करणार होत्या,पण रिहर्सलच्या काही दिवस आधी तब्बेतीच्या कारणामुळे जमणार नाही असे त्यांनी सांगितले, ऐनवेळी दुसरी कोणती अभिनेत्री मिळणार या टेन्शनमध्ये असताना प्रिया बेर्डे,वर्षा उसगावकर यांनी मात्र मला खूप धीर दिला.

मग मी ठरवलं की मराठी चित्रपटात गेस्ट म्हणून गाण्यात नृत्य केलेल्या हिंदी अभिनेत्रींपैकी कुणाला तरी विचारून बघावं. डोक्यात पहिलं नाव आलं एक दुजे के लिये या चित्रपटामुळे प्रसिध्द झालेल्या हिंदी अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचं. त्यांच्याशी माझी आधीची थोडी ओळख होती,त्यांच्या आई पुण्यात रहायला असल्यामुळे अधून मधून पुण्यात त्यांचं येणं असायचं.त्यांना मी फोन करून माझी अडचण सांगितली. ती ऐकून त्या कार्यक्रमात डान्स करायला तयार झाल्या.मी पैशाचं विचारलं आणि सांगितले की प्रत्येकाला मी सेम पेमेंट देणार आहे पाच हजार.ते ऐकून त्यांनी उत्तर दिलं” महेशजी आप प्रोब्लेममे हो, और ऐसें वक्त आपसे पैसे लिये तो वाहे गुरू( परमेश्वर) मुझे कभी माफ नही करेंगे”. रतीजींनी पैसे घ्यायला नकार दिला. महाराष्ट्रात रहात असल्याने त्या मराठी प्रेक्षकांचं ‘देणं’ लागतात म्हणून मराठी चित्रपटांच्या पंचाहत्तरी निमित्ताने मी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात डान्स करायला मिळणं हा त्यांचाही सन्मान असल्याचे रतीजींनी मनापासून माझ्याजवळ कबूल केलं.

‘मराठी तारे तारका’ कार्यक्रमाची एक नोव्हेंबर ही तारीख जवळ येऊ लागली. जवळपास अर्ध्याहुन अधिक चित्रपटसृष्टीतले कलाकार कार्यक्रमात सहभागी असल्याने गेस्ट म्हणून कुणाला बोलवायचे हा प्रश्न होता.मराठीतील काही नामवंत मंडळींना मी सम्पर्क केला पण प्रत्येकानं मला कारणं सांगून ‘नाही’ म्हणून सांगितले. मग मी निळूभाऊ फुले यांना माझी अडचण सांगितली, भाऊंनाही वाटलं की चित्रपट सृष्टीत नवीन असलेला मी,पुढाकार घेऊन, स्वतःचे पैसे खर्च करून जर चित्रपटसृष्टीसाठीच कार्यक्रम करतोय तर इतरांनी साथ द्यायला पाहिजे.मला ‘नाही’ म्हणलेल्या एका अभिनयातील बादशाह असलेल्या कलाकाराला निळूभाऊंनी माझ्यासमोर फोन लावला.भाऊंनी या कलाकाराबरोबर जुन्या चित्रपटांच्यापासून काम केले असल्याचे निळूभाऊंना विश्वास होता की तो कलाकार भाऊंनी शब्द टाकल्यावर नक्कीच ‘हो’ म्हणेन.

फोनवर नमस्काराच्या गोष्टी झाल्यावर जसं भाऊंनी कार्यक्रमाबाबत उल्लेख केला तसा समोरून फोन कट झाला. परत मोबाइल लावला तर स्विच ऑफ लागला. बराच वेळ वाट पाहून पुन्हा प्रयत्न करूनही त्या मोठ्या कलाकाराशी बोलणे झाले नाही की त्यानेही नंतर स्वतःहून निळूभाऊंना फोन करण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. मराठीतील आता कुणाच्याही मागे लागण्यात अर्थ नाही असे वाटून नवीनच खासदार झालेल्या आणि माझ्या ‘आधार’या मराठी चित्रपटात काम केलेल्या जयाप्रदा यांना मी विनंती केली. लखनऊ ला असूनही तिथून फ्लाईटने दिल्लीला आणि दिल्लीवरून परत फ्लाईटने पुण्यात येईन असा शब्द त्यांनी दिला.

एक नोव्हेंबर 2007 रोजी, कार्यक्रमाला पुण्यातील ‘गणेश कला क्रीडा’ प्रेक्षकांच्या गर्दीने भरून गेलं.माझं टेन्शन वाढू लागलं, एका अभिनेत्री बरोबर जोडीनं निवेदन करणारा अमोल कोल्हे दिलेल्या वेळेत पोचला नाही,जयाप्रदा यांचे दिल्ली ते पुणे फ्लाईट लेट झाले, त्यांनी फोनवर मला तशी कल्पना दिली आणि काही झालं तरी माझ्या कार्यक्रमाला त्या येणारच हे ही मला सांगितलं.पुणे एअरपोर्ट वर त्यांना घ्यायला मी माझ्या मित्राला पाठवलं, मी कार्यक्रम सुरू केला.कार्यक्रमाची सुरुवात रतीजी आणि रमेश भाटकर यांच्या देवी नृत्याने झाली.डान्स झाल्यावर दुसऱ्या दिवशी मुंबईत असलेल्या शूटिंगसाठी रतीजी लगेच निघाल्या. जाताना मला आशीर्वाद देऊन गेल्या.

जयाप्रदा एअरपोर्ट वर पोचल्यावर फोनवर आमचं बोलणं झालं,दुसरीकडे कुठं हॉटेलमध्ये जाऊन तयार होण्यात वेळ जाण्यापेक्ष्या त्या एअरपोर्टवर वॉश रूम मध्ये तयार होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या.अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद मला झाला. डोळ्यांचे ऑपरेशन काही दिवसांपूर्वी झालेले असूनही निळूभाऊंनी सुरेख पुणेकर हिच्या बरोबर बैठकीच्या लावणीत सहभाग घेतला. प्रत्येक कलाकाराच्या नृत्याला भरभरून प्रतिसाद मिळत होता. कार्यक्रमाच्या शेवटी स्टेजवर सर्व कलाकार एकत्र आले,तेंव्हा प्रेक्षकांनी जोर जोरात टाळ्या शिट्या वाजवायला सुरवात केली,एका रंगमंचावर एवढे सगळे कलाकार एकत्र पाहण्याचा तो दुर्मिळ योग प्रत्येकजण डोळ्यात साठवून ठेवत होता.

अशी कोणती ‘शक्ती’माझ्या मागे उभी होती म्हणून मी चाळीस कलाकारांना एकत्र आणण्याचं शिवधनुष्य पेलू शकलो हा प्रश्न माझा मलाच पडला आणि आलेल्या अडचणी डोळ्यातील अश्रूंच्या वाटे बाहेर पडल्या.जयाप्रदा यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे सत्कार झाले. जाताना मी त्यांना गिफ्ट देऊ लागलो तर गिफ्टऐवजी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. दर्शन करून त्या गाडीने मुंबईला गेल्या.

कार्यक्रम संपल्यावर सगळे कलाकार जेवायला एकत्र जमले. प्रत्येकजण माझ्याकडे येऊन माझेच आभार मानत होता.कार्यक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता,ते पाहून वाटलं चिरतरुण महागुरू अभिनेत्याने मागितलेली त्याची लाख मोलाची किंमत द्यायला मी अपयशी ठरलो असेल पण माझ्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर ‘लाख मोलाचा आनंद’ आणण्यात मी यशस्वी झालो.

सौजन्य  : महेश टिळेकर निर्माता दिग्दर्शक

हा लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका ! तुमच्या कडे काही लेख असतील तर आम्हाला पाठवा तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!