येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत

0

शूर आबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. मोठ्या रुपातील शंभूराजांचा पराक्रम आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतच. शंभूराजांच्या आगमनाची जितकी प्रतीक्षा प्रेक्षकांना होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक हुरहुर निर्माता – अभिनेता डॉ. अमोल कोल्हेला होती. निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी कसरत डॉ. अमोल कोल्हे मोठ्या शिताफीने आणि प्रगल्भतेने हाताळतोय. ही भूमिका साकारण्याचा योग येणं म्हणजे श्रींची इच्छा हाच भाव त्याच्या डोळ्यांत आणि बोलण्यात जाणवतो. डॉ. अमोल कोल्हे यांनी यापूर्वीही महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारली त्याचप्रमाणे नाटकाच्या माध्यमातून त्याने शंभूराजेही रंगभूमीवर सादर केले पण त्याहून या मालिकेचं आव्हान अधिक मोठं आहे. या भूमिकेसाठी वजन कमी करण्यापासून शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. शंभूराजांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी असणारे बंध उलगडून दाखवताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधावरही या मालिकेतून प्रकाश टाकाला जातोय. कय्युमखानावर विजय मिळवून आलेल्या शंभूराजांचं स्वागत येसूबाई कसं करणार याचीही एक निराळी उत्सुकता आहे. शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ येसूबाईंच्या हाती लागतो. त्याच्या उत्सुकतेपोटी त्या दरबारात या ग्रंथाचं वाचन ठेवतात. याच दरम्यान अणाजी आणि शंभूराजेंमध्ये मतभेदाची ठिणगी पडते आणि नव्या राजकारणाची सुरुवात होते. येसूबाई आणि शंभूराजांची पहिली भेट आणि स्वराज्यातल्या नव्या राजकीय गणितांची सुरुवात अशा अनेक घडामोडी येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

येसूबाई आणि शंभूराजे या पती पत्नीच्या प्रगल्भ नात्याचे वेगळे पदर या मालिकेच्या निमित्ताने उलगडले जाणार आहेत. पराक्रम आणि बुद्धीचातुर्याचं देणं शंभूराजांना जन्मत:च मिळालं होतं. पण व्यक्ती केवळ त्याच्या पराक्रमाने श्रेष्ठ ठरत नसते तर त्याच्यातल्या माणूसपणाने त्याचं श्रेष्ठत्व अमर होतं. शंभूराजांची ही गाथा केवळ त्यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्हे तर त्यांच्यातल्या सद्सद्विवेकी, कुटुंबवत्सल माणसाची आणि न्यायी राजाची ही कथा आहे. इतिहास रचतानाही माणूसपण जपणाऱ्या शंभूराजच्या गाथेचे अनेक पदर येत्या भागांत या मालिकेतून उलगडले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!