वेटर बनला मालक वाचा ! वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

0

संघर्षाची कहाणी हॉटेल वेटर ते हॉटेल मालक – अडाणी लक्ष्मण सस्तेचा जीवघेणा संघर्ष एखादा मुलगा शाळेत, एखाद्या परीक्षेत पहिला आला तर त्याला हुशार समजलं जातं, समाजात सर्व स्तरात त्याचं कौतुक होतं. ते करणं ही काही गैर नाही पण दुर्दैवाने आपल्याकडे इतर क्षेत्रातील टॅलेंट ची पाहिजे तेवढी दखल घेतली जातच नाही. स्टारमराठी 

एखादा मुलगा शाळेत नापास झाला तर तो उत्तम खेळाडू, गायक, व्यवसायिक, राजकारणी होऊ शकतो. त्यांच्यातील टॅलेंट वेगळं असू शकतं असा विचार अजून ही पाहिजे त्या प्रमाणात समाजमनात रूजला नाही.  इथं कायम कागदावरचे टक्के मोजले जातात पण ‘काळजा’ वरचे नाही.

अर्थशास्त्रातील गोल्ड मेडल असणाऱ्याला हुशार समजलं जातं. भले त्याच्याकडे खाण्यासाठी का पैसे नसेनात परंतु कुठलिही पदवी नसताना उत्तम घर सांभाळणाऱ्या अडाणी आई ला हुशार समजत नाहीत. न शिकलेले माणसं ही हुशार असू शकतात, ते स्वतःला सिद्ध करू शकतात. माणूस पेटला तर तो कसा ही असू द्या तो काहीही करू शकतो पण त्यासाठी पेटण्यासोबत जळतं राहणं ही तितकंच महत्वाचं असतं.

ही अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी या छोट्या खेडेगावातील लक्ष्मण सस्ते या नायकाची. एकेकाळी शाळेत नापास झाला, गावाचा, मित्राचा अपमान सहन केला. त्यात घरचा तीन पिढ्याचा आठराविश्व दारिद्र्चा वारसा, सततच्या दुष्काळाने लक्ष्मणाने शाळा सोडली पण हिंमत सोडली नाही.

अन सुरू झाला आयुष्याचा खडतर प्रवास, जीवघेणा संघर्ष !! मग मिळेल ते काम करत आई-वडिलांसोबत ऊस तोडायला सुरवात केली. सहा महिने पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायचा, गावाकडे आले की पुन्हा सहा महिने दिवसा मजुरी अन रात्री इतर हॉटेलात वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. पाटोदा येथील अनिकेत हॉटेल मध्ये आचारी, वेटर, साफ-सफाई कर्मचारी असं मिळेल ते काम केलं.

त्यातूनच काही पैसे जवळ शिल्लक राहत गेले लागले. कधी कधी गावाने हिनवले, भावकीने थट्टा मांडली पण लक्ष्मणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ग्राहकांशी कसं बोलावं ?? लोकांशी कसं वागावं ?? माणसं कशी जोडावीत ?? याची दुनियादारी शिकून घेतली.

काही वर्षे काम एके-काम चालू ठेवलं. ऊसतोडणी करताना मग हळूहळू कारखान्याला मजूर पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. हॉटेलात काम करताना त्या धंद्यातले सर्व बारकावे शिकून घेतले. आपण ही भविष्यात असं एखादं हॉटेल चालू करू असं स्वप्न पडू लागलं, तसं ते अधून-मधून आपल्या वडिलांना बोलून ही दाखवायचे, मुलाची मेहनत पाहून तु नक्की मोठ्या हॉटेल चा मालक होशील असा त्यांच्या वडिलांना ही विश्वास वाटायचा अन निरक्षर असलेले वडील त्यांना प्रोत्साहन ही द्यायचे.

अपार मेहनतीने जीवनाची गाडी पटरीवर येत असतानाच लक्ष्मण सस्ते यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आधारवड कोसळावा तसं संकट आलं. होते नव्हते ते भोवताल चे आपले माणसं दूर झाली. या जीवघेण्या धक्क्याने रडत बसण्या ऐवजी आता हे स्वप्न दोघांचं झालं म्हणून लक्ष्मण राव डबल मेहनतीने कामाला लागले.

तोपर्यंत आयुष्याचा खात्यावर अनुभवांची भक्कम रक्कम शिल्लक झाली. बाकी आर्थिक गणितं जुळवत बँक, जुने हॉटेल मालक, काही जवळचे नातेवाईक यांच्याकडून लोन घेऊन वडिलांच्या पुण्यतिथीला लक्ष्मणरावांनी मोठ्या हिंमतीने स्वतःचं छोटं हॉटेल चालू केलं. हॉटेल ला नाव दिलं हॉटेल ‘दादाश्री’ कारण ते त्यांच्या वडिलांना दादा म्हणायचे.

पुन्हा उत्तम दर्जा, अपार मेहनत अन आपल्या बोलक्या, प्रेमळ वाणीच्या साथीने कधीकाळी छोटंखाणी असलेलं हॉटेल दादाश्री आता तालुक्यातील नंबर तीनचं हॉटेल झालं आहे.जसं पोहण्यासाठी फक्त वाचून पाहून चालत नाही त्यासाठी पाण्यात उतरावं लागतं तसंच व्यवसाय करण्यासाठी मॅनेजमेंटची पदवीच असावी असं काही नाही हे त्यांनी जगाला सिद्ध करून दाखवलं.

शाळेत नापास झाला म्हणून हिनवणारे हॉटेल ला उधार जेवण जाऊ लागले. शाळा करणारे त्यांच्या यशात सामील ही झाले. आपल्याकडे दुनियादारीत असे अनेक लोक शाळा करतात पण शाळेत दुनियादारी शिकवली जात नाही. आज बीड- अहमदनगर रोडवर चुंबळीफाट्याच्या परिसरात सस्ते यांचं मोठं हॉटेल मोठ्या दिमाखात उभं आहे. असं असलं तरी ते पहायला आज वडील हयात नाहीत याची खंत लक्ष्मण रावांना बोचत राहते …,

कायमस्वरूपी आयुष्यभर …, वडील वरून पाहत असतील या एकमेव आशेवर पुन्हा ते तितक्याच जोमाने कामाला लागतात.

लक्ष्मण सस्ते  – 9767152200

Credit : चांगदेव गिते 9665975815

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!