शेतकरी असून ह्या महिलेने उभारली करोडोंची कंपनी आणि अशी आणली ओसाड गावात खुशाली.

0

महिला शेतकरी आणि तेही यशस्वी हे समीकरण कोणाच्या पचनी पडणं अगदीच अशक्य. हल्ली शेतकऱ्यांना शेतीमधून हवे तसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आपला पारंपरिक शेती हा व्यवसाय सोडून शहराची वाट धरतात. पोटापाण्याची व्यवस्था करायला जे मिळेल ते काम धरतात. काही तर आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतात. शेतीप्रधान भारत देशात हे ओसाड पडणारी गावे आणि संपणारे शेतकरी हे दृश्य खूप भयानक आहे. उत्तराखंड सारख्या डोंगराळ भागातही शेतकऱ्यांची आणि इतर लोकांचीही हीच परिस्थिती आहे. कारण रोजच्या जीवनात लागेल इतकाही पैसा कमावण्याची साधने तिथे नाहीत. तरीही अशा परिस्थितींवर मात करत दिव्या रावत हिने भारतीय शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी प्रेरणादायी असे कार्य केले आहे. फक्त मश्रूमच्या शेतीमार्फत दिव्या वर्षाकाठी करोडो रुपये कमवत आहे. ह्या महिला शेतकरीचा २०१६ साली ‘नारी शक्ती’ ह्या पुरस्काराने तात्कालिक राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान देखील झाला आहे.

कशी झाली दिव्या एक यशस्वी शेतकरी? तिचा प्रवास जाणून घेऊयात.
उत्तराखंड राज्यातील चमौली जिल्ह्यातल्या कंडारा ह्या गावातून आलेली दिव्या दिल्ली सारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेण्यासाठी राहत असताना तिला सतत गावाची चिंता असायची. सुट्टीच्या निमित्तानं गावी गेल्यावर तेथील घरांना लागलेल्या कुलुपांमुळे दिव्या कायम अस्वस्थ असायची. डोंगराळ भागात शेतीमधून मिळणाऱ्या किरकोळ उत्पन्नामुळे कंटाळून चमौली गावातून शेतकरी आणि इतर लोकही इतर शहरात पलायन करायला लागले होते. त्यांना थांबवायचं म्हणजे गावातच त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. ‘आता चार पाच हजार रुपयांसाठी शहराकडे पलायन करणाऱ्या आपल्या गावकऱ्यांना गावाकडे परत आणायचंच’ ह्याचा दिव्याने निश्चय केला आणि सोशल वर्क मध्ये मास्टर्स डिग्री घेऊन २०१३ मध्ये दिव्या पुन्हा आपल्या गावाला आली. आपल्याच गावात तिने सुरू केले मश्रूमचे उत्पादन.

आता करोडोंची टर्न ओव्हर असलेली दिव्याची कंपनी सुरुवातीपासूनच नफ्यात राहिली. पहिल्याच वर्षी तिला ३ लाखांचा नफा झाला. तिच्या ह्या बिझनेस मध्ये तिने महिला आणि शहरात पलायन करणाऱ्या युवकांना कामही दिले. सर्वसामान्य माणूस देखील हा व्यवसाय करू शकतो असे दिव्या रावतचे म्हणणे आहे. तिने मश्रुम च्या विक्री आणि मार्केटींग साठी ‘सौम्या फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी उभारली आहे. ज्यांना स्वतःचा मश्रुम व्यवसाय उभारायचा आहे त्यांच्याकरिता तिने ट्रेनिंग सेंटरही सुरू केले आहे.

उन्हाळयात मिल्की मश्रुम, पावसाळ्यात ऑईस्टर मश्रुम तर हिवाळ्यात बटन मश्रुम अशा विविध प्रकारच्या मश्रूमचे उत्पादन घेतले जाते. बटन मश्रुम ला एक महिना, मिल्की मश्रुम ला ४५ दिवस तर ऑईस्टर मश्रूमला अवघे १५ दिवसच उगवायला लागतात. त्यामुळे झटपट उत्पादन होते. मश्रूमला भरपूर मागणीही असल्याने ह्या मालाला चांगली किंमत मिळत असल्याने चमौली जिल्यातील कंडारा गावातले गावकरी आता शहराकडे जायचं नावही घेत नाहीत बघा..!! दिव्या म्हणते फक्त सांगण्यापेक्षा मी स्वतः त्यांना करून दाखवल्यामुळे ही जादू झालेली आहे.

दिव्याच्या ह्या उत्तम कार्याचा राज्य सरकारने देखील गौरव केला. तिला भारतभरात मश्रूमची ब्रँड अंबॅसॅडर किंवा मश्रुम गर्ल म्हटले जाते. तिच्या यशाची गाठ इथेच संपत नाही तर एकट्या उत्तराखंड राज्यातील १० जिल्ह्यात मश्रुम उत्पादनाच्या 53 कंपन्या तिने सुरू केल्या आहेत. एक उंचीचा खर्च फक्त ३० हजार रुपये असतो म्हणजे १५ हजार इन्फ्रास्ट्रक्चरला आणि १५ हजार उत्पादन खर्च. पण एकदा उत्पादन सुरू झाले की नफा लाखांच्या घरात..!!


दिव्या रावत गावातील लोकांना मश्रुम उत्पादन आणि त्याच्या विक्री साठी स्वतः मार्गदर्शनही करते. ती म्हणते मी कोणाला काम नाही दिलं, खरं तर मी फक्त त्यांना काम करायला सक्षम बनवलं. आम्हाला अजूनही वरचा पल्ला गाठायचा आहे. मश्रुमला आंतरराष्ट्रीय बाजरपेठ मिळवून द्यायची आहे. अर्थात ह्या सगळ्यामधे तिच्या एकटीच फायदा नसून तिच्या सारखेच मश्रुम चे उत्पादन करणाऱ्या सगळ्यांनाच आहे. खरोखरीच जो पर्यंत देशातील लोकांसाठी काम करणारी अशीही माणसं आहेत तोपर्यंत ह्या भारत देशाला आर्थिक महासत्ता बनायला कोणीही रोखू शकत नाही हे मात्र खरे..!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!