खरी मज्जा करण्यासाठी ५ दिवसाचा “गोवा” ट्रिपचा प्लॅन देतो आहोत. ‘धन्यवाद’ वगैरे राहुद्यात हो..!!

0

पिकनिक ची खरी मज्जा अनुभवायची असेल आणि जर तुमच्याकडे ५ दिवस असतील तर आम्ही तुम्हाला ती खरी मज्जा कशी अनुभवायची ह्याचा एक मस्त प्लॅन तयार करून देतो आहोत. एरवी कामातून वेळ काढला जात नाही ,आणि काढला वेळ तर मनसोक्त पिकनिक झालीच पाहिजे. नाही का? चला तर मग गोव्याचा ५ दिवसाचा मस्त ट्रिपचा प्लॅन पाहू आणि खरा आनंद मिळवू.

गोवा म्हणजे मनमुराद मजा लुटण्याचं प्रसिद्ध स्थळ. गोवा हे दोन भागात विभागलं गेलं आहे, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा. उत्तर गोवा हे तरुण लोकांसाठी आकर्षण आहे, कारण ह्या उत्तर गोव्यात सुंदर बीचेस आहेत, हॉटेल्स, रेस्टोरेन्ट्स आहेत , बार्स, कॅसिनो, आहेत म्हणून तरुणवर्ग तिकडे जास्त आकर्षित होतो.

म्हणजे हा भाग जरा गजबजलेलाच असतो. आणि दक्षिण गोवा खूप शांत आहे, सुंदर बीच इथेही आहेत, पण ह्या भागात ऐतिहासिक इमारती खूप पाहायला मिळतील. त्यामुळे तरुण इकडे जास्त नसतात. पण इतर पर्यटक ह्या शांत भागात येणं पसंत करतात.

1- बजेट ठरवा
ह्या गोव्याच्या ट्रीपला जर फक्त तरुण मंडळी ,दोस्त कंपनी जाणार असाल तर तुम्हाला जास्त एन्जॉय करायला आवडेल ना, मग आधी तुमचं बजेट ठरवा, ५ दिवस एन्जॉय करण्यासाठी हॉटेल्स जरा स्वस्तातली असली तर चालतात, पण बाकी कसं सगळं एन्जॉय करता आलं पाहिजे ना?

2. गोव्यात कधी जाल:
गोव्याला जायचं तर कधी जायला पाहिजे हे ठरवायला लागेल. गोव्यात फिरायला ऑक्टोबर ते मार्च हा पिरियड योग्य समजला जातो कारण एप्रिल ते सप्टेंबर पाऊस भरपूर असतो. मग आपली ट्रिप फिक्स करून घ्या,आणि ट्रिपच्या आधी एक महिना तरी फ्लाईट चं बुकिंग करून ठेवा, म्हणजे रेल्वे चा प्रवास टाळू शकाल.

वेळ सुद्धा वाचेल. आणि ५दिवसातले २ दिवस दक्षिण गोवा, २ दिवस उत्तर गोवा, आणि एक दिवस दूध सागर, अशी ट्रिप प्लॅन करा.

3- राहण्यासाठी कोणती हॉटेल्स निवडली पाहिजेत:
तरुण मंडळी ,दोस्त कंपनी असेल तर तुमचं बजेट १०हजारांपासून ते पुढे कितीही असू शकेल. अगदी ५ लाखापर्यंत सुद्धा तुम्ही बजेट तयार करू शकता. मोठं बजेट असेल तर स्टार हॉटेल्स आहेत, कमी बजेट असेल तर गोवा पर्यटन विभागाची छोटी हॉटेल्स सुद्धा मिळतात, अगदी ८००/- ते १२००/-रुपये पर्यंत.

४ – पीक सीझन असेल तेंव्हा?
पीक सीझन असेल त्यावेळी ऑनलाइन बुकिंग आधीच करून ठेवायला लागते, कारण नंतर ही हॉटेल्स महाग पडतात. म्हणून ट्रपची तारीख ठरली की आधी हे बुकिंग करून ठेवा म्हणजे पुढे वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होईल.

५- बीच कोणते कोणते पाहाल:
गोव्याचे स्वच्छ सुंदर बीच बघण्यासारखे आहेत, बागा बीच, वेगाटोर, कोलवा, कलंगुट, डोना, पॉला, मीरमार, बोगमालो, अंजुना, पालोलेम,अराम बोल, एवढे सुंदर बीच पाहायचा आनंद वेगळाच आहे. गोव्याचं नाईट लाईफ एन्जॉय करता येण्यासारखं आहे. पहिली गोष्ट इथे बिअर स्वस्त मिळते, त्यामुळे बिअर शौकिनांसाठी पर्वणीच आहे.

६- बीचवर वॉटर स्पोर्ट्स ची मजा काही औरच असते, बनाना राईड्स,पॅरासेलिंग, बंपर राईड, जेटस्की, बोट राईड, पॅरा ग्लायडिंग हे सगळे खेळ तुम्ही खेळून त्यातली मजा घेऊ शकता. शिवाय डॉल्फिन क्रूज ने कलंगुट आणि बागा बीच वर सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी क्रूज वरून पाण्यात खेळणारे डॉल्फिन बघायला सगळेच उत्सुक असतात.

७- फिरायला पण बरीच ठिकाणं आहेत:
पणजी, वास्को द गामा, मडगाव, मापूसा, फोंडा, ओल्ड गोवा, वेगाटोर, बेनॉलीम आणि दूध सागर धबधबा , एवढी ठिकाणं नुसती फिरून निसर्गाचा आनंद लुटायला तुम्हालाही आवडेल.

जंगल सफारी साठी बोण्डला ,कावल, महादोई , भगवान महावीर सेंच्युरी, मोलम नॅशनल पार्क, एवढी मोठी ठिकाणं जंगली प्राणी समोर प्रत्यक्ष पाहायला खूपच थ्रिलिंग अनुभवता येतं.

८- सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे शॉपिंग:
मापूसा हे खूपच प्रसिद्ध आहे शॉपिंग साठी, इथं आहे खूप मोठा बाजार, अंजुना हे सुद्धा लेटेस्ट ट्रेण्डी कपड्यांच्या शॉपिंग साठी प्रसिद्ध ठीकाण आहे, कापड्यांशिवाय बॅग्ज, स्कार्फ, शूज,आणि स्त्रियांचे अलंकार आभूषणं, हे अगदी स्वस्त आणि मस्त म्हणून सगळे मनसोक्त खरेदी करतात. तुम्हाला पण ही पर्वणीच ठरणार.

९- खान पान म्हणजे गोव्याची स्पेशालिटी.
मासे खाणाऱ्यांनी वेगवेगळी चव चाखायला खूप हॉटेल्स आहेत, नॉनव्हेज सगळीकडे पाहिजे ते मिळतं. झिंगे, लडी फिश, मसल्स, लॉबस्टर्स, अगदी ताजे ताजे खाण्याची मजा गोव्यातच. व्हेज खाणारे सुद्धा तृप्त होतात गोवन टेस्ट घेऊन. पोर्क विंदूला म्हणजे गोव्याचं लोकप्रिय खाद्य. तोंडाला पाणी सुटलं ना?

१०- गोव्यात धार्मिक स्थळं सुद्धा भरपूर आहेत , अनेक चर्च आहेत, आणि मंगेशी, म्हाळसा, महालक्ष्मी, कामाक्षी, शांतादुर्गा, नारायणी, भगवती, ह्या सगळ्या देवतांची भव्य मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्येक मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मनाला समाधान देणारं ठिकाण म्हणजे मंदिर.

गोव्याला जाण्यासाठी देशाच्या सगळ्या मोठ्या शहरातून विमानसेवा आहे. आणि पणजी पासून २६ कि. मि. अंतरावर गोव्याचं डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमान तळ आहेत. त्यामुळे कुठेही जाणे सहज आणि सोपे आहे. आणि गोव्यात फिरण्यासाठी भाड्याने कार्स सुद्धा मिळतात. त्यामुळे सगळ्या सोयी मिळणारी ही ट्रिप प्लॅन करा आणि खरी मज्जा अनुभवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!