निळाशार समुद्र आणि ५५७ बेटांचा समूह.. अंदमान निकोबार बद्दल जाणून घ्या अजूनही काही अद्भुत गोष्टी.

0

इंग्रजांच्या काळात त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली होती त्यांना ती भोगण्यासाठी पाठवलं जायचं अंदमान – निकोबार बेटावर. भयाण जंगल , कुत्रं सुद्धा फिरकणार नाही अशा ठिकाणी ठेवलं जायचं कैद्यांना. काही भागात जे जंगली लोक राहतात त्यांचा आपल्या दुनियेशी आज सुद्धा काहीही संबंध ठेवत नाहीत ते लोक. मग त्यावेळची परिस्थिती काय असेल?

१- ह्याच अंदमान निकोबार मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा पहिला “तिरंगा” “फडकला” . ‘पोर्ट ब्लेअर’ ही अंदमान निकोबार द्वीप समूहाची राजधानी आहे, आणि ह्याच राजधानीत हा भारताचा तिरंगा फडकला होता. ही महत्वाची घटना कदाचित तुम्हाला माहिती नसेल. ह्याच पोर्ट ब्लेअर मध्ये अतिशय निर्जन ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा तुरुंग बनवला गेला होता आणि तिथं सगळे कैदी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा ह्या तुरुंगात ठेवलं होतं.

२- अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे हा अंदमान निकोबार द्वीप समूह. जगभर ह्या निसर्गाच्या सौंदर्याची ख्याती आहे. ह्याला द्वीप समूह म्हणून ओळखलं जातं त्याचं कारण म्हणजे ५७२ छोटे छोटे द्वीप म्हणजे बेटं मिळून तयार झालेला आहे हा निसर्गाचा खजिना. ह्या ५७२ बेटांपैकी फक्त ३६ बेटं अशी आहेत की जिथे माणसांना जाता येतं. बाकी इतकी घनदाट आहेत की त्यात प्रवेश करणं शक्यच नाही. 

३- अंदमान हा शब्द तिथल्या मलय भाषेतल्या हिंदूमन ह्या शब्दावरून आला असं म्हटलं जातं. इथल्या एका भागात जारवा जातीचे लोक राहतात, त्यांची सगळे मिळून लोकसंख्या ५०० पेक्षा जास्त नसावी, पण हे आदिवासी लोक बाहेरच्या लोकांशी अजिबात संपर्क सुद्धा ठेवत नाहीत. ही एक आश्चर्याची गोष्ट म्हणता येईल.

४- निकोबार ह्या ठिकाणी पर्यटकांना जाण्याची परवानगी नाही . फक्त मोजक्याच लोकांना निकोबारमध्ये प्रवेश दिला जातो. ५- जगातलं एक आश्चर्य ह्या बेटांवर पाहायला मिळतं, आणि ते म्हणजे जगातलं सगळ्यात मोठा कासव फक्त ह्या बेटावर पाहायला मिळतं, आणि जगातलं सगळ्यात लहान कासव सुद्धा फक्त इथेच पाहायला मिळतं. ६- आणखी एक कदाचित तुम्हाला माहिती नसलेली गोष्ट म्हणजे , आपल्या भारतीय चलनी नोटांमधली २० रुपयांची नोट जरा निरखून पहा , ह्या नोटेच्या मागच्या बाजूला एक सुंदर निसर्ग चित्र छापलं आहे ते ह्या अंदामानच्याच एका निसर्ग रम्य भागाचं आहे हे तुम्हाला बघता येईल.

७- ह्या अंदमान निकोबारच्या विस्मयकारी परिसरात आणखी एक गोष्ट तुम्हाला आश्चर्यजनक वाटेल आणि ती पाहून तुम्ही घाबरून जाल, ह्या भागात एक प्रकारचे मोठे खेकडे पाहायला मिळतात , ह्या खेकड्यांची लांबी अंदाजे एक मीटर असते. एवढा मोठा खेकडा तुम्ही कधी पहिलाच नसेल ना? ह्या खेकड्यांना कोकोनट खेकडे म्हणून ओळखले जाते, त्याचं कारण म्हणजे ह्या खेकड्यांचं मुख्य अन्न म्हणजे ‘नारळ’. इतक्या मोठ्या नारळाचं बाहेरचं आवरण हे खेकडे सहज फाडून काढतात आणि आतल्या खोबऱ्यावर ताव मारतात. ही एक विशेष गोष्ट आहे म्हणून सांगितली.

८- अंदमान आणि निकोबार परिसरात विक्रीसाठी मोठ्याप्रमाणावर मासेमारी करायला बंदी आहे. इथे माशांना मुक्तपणे आयुष्य जगण्याची मुभा आहे. त्यामुळे इथं भरपूर जातीचे मासे स्वैर पणे समुद्राच्या लाटांबरोबर संचार करताना दिसतात. असंख्य जातीचे मासे इथे आनंदाने राहतात कारण त्यांना जाळ्याची भीतीच नाही.

असा हा अंदमान निकोबारचा निसर्ग आणि आश्चर्यकारक गोष्टी, इथे आयुष्यात एकदा तरी पहायला जाणं म्हणजे स्वर्गीय अनुभव घेणं. मग चला अंदमान निकोबारची स्वारी करू. देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या आठवणी जागवू , आणि अनुभव घेऊ त्या स्वर्गीय सुखाचा.

– सुधीर हसबनीस

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!