घोडखिंड जर पावन खिंड झालीचं नसती तर ! संकटाला सळो की पळो करणाऱ्या लढवय्याची यशोगाथा !

0

अंगामध्ये लढण्याची उर्मी असली की मग लढाई कोणतीही असो ! किंवा कुणासोबत ही असो ! असलं कसलच भान लढाई करणाऱ्या लढवय्या ला राहत नाही. मेंदू ,शरीर आणि बुद्धी तेज विचार लढवय्या कडे असणं फार गरजेचं असतं. कारण प्रश्न असतो आपल्या मातीचा ! प्रश्न असतो आपल्या स्वराज्याचा ! प्रश्न असतो आपल्या मायभूमीचा आपल्या कर्मभूमीचा ! ह्या मायकर्मभूमीच्या रक्षणाचा प्रश्न उधभवला की मग खरी गरज असते निस्वार्थी लढाई करण्याऱ्या लढवय्यांची.

असाच एक निस्वार्थी , त्यागी लढवय्या ह्या मराठी मातीत होऊन गेला. सह्याद्रीच्या कड्याकपारित त्याचा कामाचा अभिमान जिवन्त ठेवून गेला. शिवाजी महाराजांच्या राज्यात एक शूर योद्धा होऊन गेला तो म्हणजेच बाजी प्रभू देशपांडे ! खिंड पावन करणारा योद्धा ! बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील  भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मांनीच्या यात्रेतील एक लढवय्या. असा लढवय्या की जो जिवाची कसलीच पर्वा न करता शत्रू वर तुटून पडायचा. स्वराज्याच्या मातीचं रक्षण करायचा. बाजी प्रभू हे असं व्यक्तिमत्व होतं की कोणतंही काम राजेंनी त्यांच्यावर सोपवलं तरी त्यात ते नावाप्रमाणेच बाजी मारायचे. असे अनेक योद्धे शिवाजी महाराजांनी या स्वराज्य रक्षणासाठी तयार केले होते. त्यातलेच बाजी हे एक.

सिद्दी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडली.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी – फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. .

समोर कोण आहे ? सैन्य किती आहे ? आपल्याला ही लढाई झेपेल का ? अश्या कसल्याच प्रश्नांची कोणतीच पर्वा न करता. निस्वार्थी भावनेनं लढणाऱ्या ह्या लढवय्याला या सह्याद्रीच्या मातीचा कडक सलाम ! आणि शिवाजी महाराज यांच्या राजेशाही ( जनतेसाठी ) कर्तुत्वाला अभिमान मानवंदना..

लेखक : कृष्णा विलास वाळके

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!