जेवणा नंतर थोडं फिरणं किंवा चालणं किती फायद्याचं आहे हे कळल्यावर तुम्ही सुद्धा आजपासूनच सुरू कराल.

0

तुम्हाला तुमचं शरीर फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी पाळाव्याच लागतात. म्हणजे काय काय करावं लागेल हे ऐकून आपण त्या न करता थोडा आळस करून ते आपल्याला रोज जमणार नाही म्हणून सोडून देतो, किंवा सुरूच करत नाही. मुळात आळस नसलेला माणूस सतत फिट राहण्याचा प्रयत्न करतो, आणि आळशी माणूस सतत चालढकल करून कधीच शरीरानं फिट राहत नाही हे सगळ्यांनाच कळतं पण वळत नाही. त्याला अनेक कारणं पण असू शकतात म्हणा.

कोणाच्या नोकरीतल्या सतत बदलणाऱ्या शिफ्टस असतात, तर कोणाला घरापासून खूप दूर कामाला जावं लागतं, तर कोणाला शारीरिक कष्ट जास्त असतात तर कोणाला मानसिक कष्ट जास्त असतात. ह्या कारणासाठी बरेच लोक फिट राहण्यासाठी काहीच करू शकत नाहीत. पण निदान जेवण झाल्यावर शतं- पाऊली करणं किंवा थोडं गार्डनमध्ये फिरून येणं खूप फायद्याचं असतं आणि तेवढं केलं तरी तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात.

१- पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर फिट ठेवायचं असेल आणि तर संध्याकाळचं जेवण हे इच्छा भोजन , म्हणजे हलका आहार घेतला पाहिजे, अगदी पोटाला ताण पडेपर्यंत रात्रीचं जेवण घ्यायचं नाही. आणि हे जेवण खूप रात्र झाल्यावर नाही तर संध्याकाळी ७:०० च्या आसपास घेतलं पाहिजे. आणि नंतर थोडा वेळ गेल्यावर रोज शतं पाऊली केलीत किंवा एखाद्या गार्डनमध्ये फिरून आलात तर त्याचा खूप फायदा होतो. मुख्य म्हणजे फिरल्यामुळे पोटातला गॅस निघून जातो, आणि पचन क्रिया सुधारायला लागते.

२- दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक जेवल्या नंतर स्वस्थ बसून राहणं पसंत करतात, त्यामुळे शरीर सुस्त होतं, शरीरात आळस भरतो. ही सुस्ती येऊ नये म्हणून शत पाऊली करणं हिताचं ठरतं. फिरून आल्यामुळे रात्री झोप सुद्धा चांगली लागते.

३- शत पाऊली केल्यामुळे शरीरातल्या रक्त वाहिन्या कार्यरत राहून रक्ताभिसरण चांगले व्हायला लागते, आणि अन्न सहज पचते.

४- जेवणानंतर चालल्या मुळे आपल्या शरीरातल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. पण हे चालणं खूप जलद गतीने नसावं, अगदी सावकाश, शांत , मनातले ताण तणावाचे विचार घालवत निवांतपणे चालावं.

५- रोज अशी शत पाऊली किंवा फिरून आलात तर मधुमेही व्यक्तींना शरीरातली साखर ताब्यात ठेवणं सहज शक्य आहे. मानसिक ताण कमी करत शांतपणे फेऱ्या मारल्या की अपोआपच शुगर कंट्रोलमधे येईल आणि शरीर स्वास्थ्य सुधारायला मदतच होईल.

असे आहेत सगळे शत पाऊली, किंवा जेवणानंतर थोडं पाय मोकळे करून येण्यामुळे होणारे चांगले फायदे. मग आता वाट कसली पाहता. कोणतं ही काम करत असलात तरी रोज न चुकता जेवण झाल्यानंतर कमीत कमी ३ ते ५ मिनिटं चालणं जर इतकं फायदेशीर असेल तर आजपासूनच सुरू करा आणि स्वस्थ आणि सुदृढ आयुष्य जगा. निरोगी रहा, प्रसन्न रहा. सुदृढ आणि निरोगी शरीर थकत नाही, सतत कार्यरत राहतं, त्यामुळे मन प्रसन्न राहतं, ताण तणाव नाहीसे झाल्यामुळे कोणतेही आजार आपल्या जवळपास सुद्धा फिरकत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!