तुम्ही जर जुने बल्ब काढुन CFL लावताय ? तर या गोष्टी पहा !

0

वाढती लाईट बिल्स ही सगळ्यांचीच डोखेदुखी आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा वीज नव्हती तेव्हा लाईट बिल नावाचा बागुलबुवा ही नव्हता. आता मात्र अत्याधुनिक उपकरणांमुळे प्रत्येकाच्याच घरी हजारो रुपयांचे विजेचे बिल येऊन महिना अखेरला धडकते आणि त्याच्या बरोबर आपले हृदय देखील धडकायला लागते. देव जाणो ह्या वेळी कितीचा भुर्दंड पडतोय..!! तरीही दक्ष नागरिक वीज वाचवण्याचा प्रयत्न करतात. वापरात नसताना उपकरणे बंद ठेवतात. ह्यामुळे पर्यावरणाची हानी टळते आणि पैसेही वाचतात. पण तिन्हीसांजेला दिवा बत्ती बरोबर सगळ्यांच्या कडे उजेडही हवाच ना..??

म्हणून आपण ट्यूब आणि बल्ब चा वापर करतो. त्यातही सी एफ एल बल्ब चा सर्रास वापर सगळीकडे चालतो. लाईट बिल मध्ये फरक जाणवतो ना.. म्हणजे नेहमीपेक्षा पाच पन्नास रुपये कमी. पण अर्थात, उपयोग तर होतोच..!! पण हेच सी एफ एल चे बल्ब जर योग्य तऱ्हेने न हाताळल्यास मात्र खूप मोठा आघात आपल्याला सहन करावा लागू शकतो. तुम्हाला ह्या बद्दल माहिती आहे का..??

कॅनडा मध्ये एक व्यक्तीने सी एफ एल बल्ब चा दुष्परिणाम भोगलाय आणि त्याला कदाचित त्याचा पायच गमवावा लागु शकतो. कारण हा बल्ब बदलताना खाली पडून फुटलेल्या काचांवर पाय पडल्याने ‘स्मिथ’ नावाच्या कॅनेडियन व्यक्तीला जबर इजा झाली. त्याचे कारण असे की सी एफ एल बल्ब मध्ये पारा हा घटक असतो जो आपल्या शरीरास अत्यंत घातक असतो. आणि हाच पार स्मिथ च्या पायात जखमेतून गेला. त्याचा भयंकर परिणाम त्याच्या पायावर झाल्यामुळे त्याला आय सी यु मध्ये ठेवावे लागले आहे. असे आपल्या सोबत होऊ नये म्हणून फुटलेल्या सी एफ एल बल्बची योग्य त्या पद्धतीने विल्हवाट लावणे गरजेचे आहे.

फुटलेल्या सी एफ एल बल्बला कसे हाताळावे ?

१. सी एफ एल बल्ब बदलताना तो थंड होऊ द्यावा आणि मग काढावा. म्हणजे चटका लागून तो हातातून निसटून पडणार नाही.

२. जर एखादा बल्ब पडून फुटलाच तर त्या खोलीतून काही काळ बाहेर थांबावे आणि कोणत्याही काचेच्या तुकड्यावर पाय पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

३. ज्या खोलीतील सी एफ एल बल्ब फुटला आहे तेथील पंखा बंद करावा म्हणजे पारा घरभर पसरणार नाही.

४. जवळजवळ १५ – २० मिनिटांनी त्या खोलीत तोंडाला रुमाल बांधून जावे. सगळा पारा आणि काचा व्यवस्थित सुपलीत जमा कराव्यात. झाडू पेक्षा पुठ्ठ्याने पारा जमा करावा. नाहीतर सेलो टेप चिकट बाजूच्या साहाय्याने जमा करावा.

५. प्लास्टिक अथवा कागदी पिशवीत सी एफ एल बल्ब चा कचरा भरूनच तो कचरावाल्यांकडे देताना सांगून द्यावा.

६. पारा हाताला लागला असल्यास हाथ साबणाने स्वच्छ धुवावेत. आणि चुकून इजा झाली असल्यास लगेच डॉक्टरला दाखवावे.

शिसे आणि आर्सेनिक पेक्षाही पारा जास्ती घातक असतो. त्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सी एफ एल बल्ब कायम काळजीपूर्वकच हाताळावा. नाहीतर सरळ एल ई डी बल्ब चा पर्याय ठेवावा. हे बल्ब महाग असले तरी ‘शीर सलामत तो पगडी पचास’ नाही का..?? ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वतःला आणि आपल्या लोकांना असल्या अपघातांपासून दूर ठेवा..

सोनिया हसबनीस – सावंत

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!