शिवरायांच्या कुटुंबाबद्दल ही माहिती माहित आहे का ?

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा !! जय शिवराय ! छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता चौथीपासुन शिकत आलो आहे. त्यांनी जिंकलेले किल्ले, लढाया आपणास तोंडपाठ आहे; परंतु आजही अनेक शिवप्रेमींना महाराजांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही किंवा कदाचित ती गोष्ट आपल्या अभ्यास आली नाही म्हणून नजरेतून चुकली.

त्या सर्वांसाठी महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे. स्वराज्यनिर्मिती कार्यात आप्लुअल महाराष्ट्रातील वजनदार आणि पराक्रमी सरदारांची गरज भासणार आहे हे शहाजीराजे आणि आई जिजाऊ यांनी ओळखलं होतं. त्या मातब्बर सरदारांशी नाते जोडुनच त्यांना एकत्र आणता येईल या उद्देशाने त्यांनी शिवरायांचे आठ वेगवेगळ्या सरदारांच्या मुलींसोबत विवाह लावुन दिले. शहाजीराजे-जिजाऊंचा उद्देश सफल झाला आणि हे सरदार स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात सहभागी झाले.

१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकर घराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांच्या वडिलांचे तर बजाजी निंबाळकर हे बंधुचे नाव. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह सन १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली. एक मुलगा आणि तीन मुली. पहिले आपले संभाजीराजे भोसले.

सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या जिऊबाई उर्फ येसुबाई यांच्यासोबत झाला. त्यांच्या तीन मुली होत्या – १) सखुबाई – सखुबाईंचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्यासोबत झाला. २) राणुबाई – राणुबाईंचा विवाह सिंदखेडराजा येथील अचलोजी जाधवराव यांच्यासोबत झाला. ३) अंबिकाबाई – अंबिकाबाई यांचा विवाह तारळे (सातारा) येथील हरजीराजे महाडिक यांच्यासोबत झाला. सईबाईंचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.

२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि सगुणाबाईंचा विवाह सन सन १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक मुलगी झाली. राजकुंवरबाई उर्फ नानीबाई. सगुणाबाईंच्या पोटी जन्मलेल्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्यासोबत झाला. त्या द्वितीय पत्नी होत्या कि तृतीय यावर अजूनही वाद होतात म्हणून मी छत्रपतींच्या पत्नींचा क्रम असाच आहे याची ग्वाही देत नाही.

३) सोयराबाई – सोयराबाई या शिवरायांच्या तृतीय पत्नी होत्या. तळबीडच्या मोहिते घराण्यातील सोयराबाईंचे वडील संभाजी मोहिते हे त्यांचे वडील तर छत्रपतींच्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह सन १६५० पुर्वी झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना दोन अपत्ये झाली.

एक मुलगा, महाराज राजाराम आणि एक मुलगी दिपाबाई. राजाराम महाराजांचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई, हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी, कागलकर घाटगेंची कन्या जानकीबाई, अंबिकाबाई यांच्यासोबत झाला आणि दिपाबाई उर्फ बाळीबाई यांचा विवाह विसाजी उर्फ विश्वासराव यांच्यासोबत झाला. त्यांचा मृत्यु १६८१ च्या उत्तरार्धात रायगडावर झाला.

४) पुतळाबाई – पालकर घराण्यातील पुतळाबाई या शिवरायांच्या चौथ्या पत्नी होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५३ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन जुन १६८० मध्ये शिवरायांच्या निधनाने खचुन जाऊन रायगडावरच त्यांचाही मृत्यु झाला.

५) लक्ष्मीबाई – विचारे लक्ष्मीबाई या शिवरायांच्या पाचव्या पत्नी. जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना सन १६५६ पुर्वी महाराजांशी त्यांचा विवाह झाल्याचे सांगितले जाते. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु सन १६७० मध्ये झाला.

६) सकवारबाई – सकवारबाई या शिवरायांच्या सहाव्या पत्नी असुन त्या गायकवाड घराण्यातील होत्या. शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह सन १६५७ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक मुलगी झाली. कमळाबाई. सकवारबाईंच्या पोटी जन्मलेल्या कमळाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत झाला. सकवारबाईंचा मृत्यु १७०७ मध्ये झाला.

७) काशीबाई – काशीबाई या शिवरायांच्या सातव्या पत्नी असुन त्या सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७४ मध्ये झाला.

८) गुणवंताबाई – गुणवंताबाई या शिवरायांच्या आठव्या पत्नी असुन त्या विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील होत्या. सरदार शिवाजीराव इंगळे हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.

शिवरायांची अपत्ये छत्रपती शिवाजी महाराजांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई या चार पत्नींपासुन सहा मुली आणि दोन मुले झाली. महाराणी पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई या निपुत्रीक होत्या. तुम्हाला ही माहिती जर माहिती नसेल किंवा तुमच्या माहितीत भर पडली असेल तर हा लेख शेयर करा आणि आम्हाला फेसबुकवर लाईक करा.

स्त्रोत: मराठी कोरा, विकासपिडिया, युट्यूब, नवनाथ अहेर यांचा ब्लॉग, मायबोली.कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!