हि छोटीशी मुलगी काढणार ११ एकर जागेवर ‘ छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ भव्य दिव्य रांगोळी !

0

भन्नाट इच्छा शक्ती आणि लहानपणापासून चित्रकलेची आवड ह्या दोन्हीचा संगम झाल्यावर काय घडू शकतं? ‘एक सुंदर चित्र’. चित्र कोणाचं? तर महाराष्ट्राचं दैवत ‘क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती श्री “शिवाजी” महाराज’ याचं भव्य चित्र. भव्य म्हणजे केवढं? ते चित्र बघायचं असेल तर फक्त हेलिकॉप्टर मधूनच बघावं लागेल एवढं भव्य. कारण डोळ्यात नाहीच मावणार हे चित्र, म्हणून हेलिकॉप्टर मधून बघावं लागेल. आता विचारच करा की ‘अकरा एकर’ जागेत काढलेलं हे चित्र केवढं मोठं असणार. हे चित्र नुसतं पेन्सिल घेऊन नाही काढणार तर असंख्य रंग रांगोळीत एकत्र करून रंगोळीतून साकारलं जाणार आहे हे चित्र.

सुमारे चार लाख चाळीस हजार स्क्वेअर फूट एवढी भव्य असणार आहे ही रांगोळी. आता एवढी मोठी रांगोळी काढायची म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही, हे दिवाळीत चारपाच दिवस रोज दारासमोर रांगोळी काढणाऱ्या आपल्या घरातल्या महिलांनाच माहिती असणार की किती कष्ट घ्यावे लागतात असल्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला. आणि मग ही अकरा एकर जागेमध्ये एवढी मोठी रांगोळी काढायला किती महिला एकत्र याव्या लागतील?

पण ही चार लाख चाळीस हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी फक्त एक आत्ता सातवीत शिकणारी म्हणजे साधारण बारा वर्षे वयाची चिमुरडी पोर एकटीच साकारणार आहे आणि त्या रांगोळीतून आपल्याला दिसणार आहेत साक्षात ‘छत्रपती शिवाजी महाराज’. महाराजांची संपूर्ण उभी रुबाबदार आकृती, भरजरी अंगरखा, मोत्यांचा मुकुट, कंबरेला जरीचा शेला, हिरे जडित चमकणारी तलवार, पायातल्या नक्षीदार मोजड्या, गळ्यातले सुंदर सुंदर अलंकार, भरदार दाढी, आणि पिळदार मिशा, धारदार नाक आणि तेजस्वी करारी नजर. अशी सुंदर रांगोळी ही छोटी मुलगी काढणार आहे. हे एक ‘आश्चर्यच’ म्हणावे लागणार आहे.

कोण आहे ही छोटीशी मुलगी? जी एवढं मोठं धाडस करणार आहे. हे धाडस म्हणजे तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीचा उत्कट अनुभव असणार आहे. आणि ती तो सहज पेलणार आहे असं तिच्या बोलण्यातून कळतं आहे. ह्या मुलीचं नाव आहे “सौंदर्या संदीप बनसोड”. रांगोळी काढण्याचा विचार तिने तिच्या आई आणि वाडीलांसमोर बोलून दाखवला, आणि त्यांनी तिच्या ह्या धाडसाला पाठिंबा दिला. झटक्यात होकार दिला आणि लगेच लागले तयारीला.

१९ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या दिवसासाठी हे मोठं काम हाती घेतलं ह्या कुटुंबानं. किती रांगोळी लागणार ह्या भव्य कामासाठी ? सुमारे २०० ते २५० टन रांगोळी लागणार आहे ह्या भव्य दिव्य कामासाठी. राजस्थान मधून सुमारे १५ ट्रक रांगोळी मागवली आहे आणि एक फेब्रुवारीला ही रांगोळी काढायला सुरुवात होईल आणि १८ फेब्रुवारी पर्यंत ही रांगोळी पूर्ण होईल. आणि १९ तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी ही रांगोळी सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. ‘सौंदर्या’ ह्या छोट्या मुलीला काही लोकांनी विचारलं की ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली? आणि शिवाजी महाराजांचीच रांगोळी काढायचा विचार तुझ्या मनात कसा आला?

तर ही मुलगी म्हणाली की छत्रपतींनी वयाच्या १४व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला होता हे आम्हाला इतिहासातून कळले मग आपण पण तसे काहीतरी करू शकतो. म्हणून तिने शिवाजी महाराजांनीच मोठी रांगोळी काढायची इच्छा आई वडिलांना बोलून दाखवली.ही प्रेरणा तिला शिवाजी महाराजांकडूनच मिळाली असं तिने सगळ्यांना उत्तर दिलं. ह्या चिमुरडीच्या भव्य कामाची नोंद गिनीज बुक मध्ये होणार आहे. पण एवढ्या मोठया कामासाठी खर्च सुद्धा खूपच येणार आहे हा खर्च सुमारे ४०, ००, ०००/- रुपये(चाळीस लाख रुपये) इतका आहे. हा खर्च सौंदर्याचे वडील स्वतः काही कर्ज घेऊन करायच्या तयारीत आहेत .

काही उद्योजक त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत, काही राजकीय मंडळींनी त्यांना मदत करायची तयारी दाखवली आहे. आणि काही महाराष्ट्रातल्या शिव प्रेमींनी छोट्या छोट्या रकमेतून जमा करून हा खर्च भागवायची तयारी केली आहे. या शिवाय आणखी काही लोक ज्यांना ह्या मुलीचं कौतुक वाटते तेही तिला मदत करून तिच्या ह्या भव्य स्वप्नाला साकार करायला निश्चितच पुढे येतील. आजच ह्या रांगोळीला सौंदर्याने सुरुवात केली आहे , तिचं हे भव्य स्वप्न साकार होण्यासाठी आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राच्या शुभेच्छा तिच्या पाठीमागे असतील ह्यात शंकाच नाही. आपण सुद्धा देऊया आपल्या मनापासून शुभेच्छा.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!