धरमपालजी ‘एम डी एच’ चे ब्रँड अँबॅसेडर कसे झाले वाचा !

0

असली मसाले सचसच.. एम डी एच..!! हे एम डी एच मसाल्यांच्या जाहिरातीचे जिंगल किमान मागच्या ३ पिढ्यांना माहीत आहे. नव्हे नव्हे पाठ आहे.. आपल्या घरातल्या आजोबांप्रमाणे आपण ह्या जाहिरातीतले आजोबाही पाहत आलो आहोत. एम डी एच म्हंटले की त्या मसाल्याच्या पाकिटावरचं त्या आजोबांचे चित्र लगेच डोळ्यासमोर येते. खरे तर मसाले हा स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग. जिथे गृहिणींची सत्ता चालते.

पण ह्या आजोबांनी मात्र सगळे स्टीरिओटाईप खोडून काढलेत. ‘महाशियन दी हट्टी’ असे नाव असलेली म्हणजेच एम डी एच ही मसाल्यांची कंपनी ह्या आजोबांनी सुरू केली. त्यांचे नाव आहे धरमपाल गुलाटी..!! ह्यांच्या बद्दल सांगण्यासारखे खूप काही आहे. कारण भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे.

ही त्यांच्या साठी आणि त्यांच्या मोठ्या कुटुंबकबिल्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी त्यांना हे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यांचे आयुष्य खरोखरीच प्रेरणादायी आहे. आज आपण त्यांच्या बद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया..

 

धरमपाल गुलाटी ह्यांचे वय आहे ९५ वर्षे पण अजूनही ते एम डी एच ह्या ग्रुप ऑफ कंपनीज चे सी इ ओ आहेत. इतकेच नाही तर FMCG सेक्टर मधील सगक्यात जास्ती पगार मिळवणारे ते एकमेव भारतीय सी इ ओ आहेत. मागच्या वर्षी पर्यंत त्यांना २५ करोड इतकी सॅलरी इन हँड मिळत होती. असे असूनही मिळणाऱ्या पगाराच्या किमतीतील ९० टक्के हिस्सा मात्र ते दान करून टाकतात. ह्या रकमेतून ते समाजसेवा म्हणून २० शाळा आणि १ हॉस्पिटल चालवतात.

त्यांच्या कंपन्यांमधील स्टाफ त्यांना जगातील सगळ्यात कूल सी इ ओ मानतात. त्याची गम्मत अशी आहे की, ह्या वयात सुद्धा ते खूप ऍक्टिव्ह आहेत, सगळ्यांशी खूप खेळीमेळीने वागतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर सदानकदा एक सुंदर हास्य असते. अजूनही प्रत्येक बोर्ड मिटींगला ते आवर्जून उपस्थित असतात आणि मिटींगला विषय कितीही गंभीर असला तरी तिथे हास्याचे तुषार उडवतात.

धरमपालजी, आजोबा किंवा पणजोबांच्या वयाचे असले तरी रोज पहाटे ४ ला उठून पंजाबी गाण्यांवर ठेका धरून जोरदार व्यायाम करतात. डंबेल्स देखील मारतात. स्वतःच्या मसाल्यांची जाहिरात देखील करतात. त्यासाठी जाहिरातीचे शुटिंग सुद्धा सहज करतात. इतक्या जास्ती वयाचे हे एकमेव जाहिरात मॉडेल आहेत. स्वतःच स्वतःच्या मालाची जाहिरात करण्यामागे मजेशीर किस्सा देखील आहे.

ह्या जाहिरातीत लग्नाचा सीन शूट केला जात असताना जाहिरातीतील वधू पिता काही कारणवश शूटिंगला येऊच शकला नाही. दिग्दर्शकाने शक्कल लढवून गुलाटीजींनाच हा छोटासा रोल करण्यासाठी विनवले. आणि अहो आश्चर्यम..!! स्वतः सी इ ओ ह्या जाहिरातीत झळकला. तिथून पुढे प्रत्येक जाहिरातीत धरमपालजी दर्शन द्यायचेच.

आपल्या ‘जिंदादिल’ इमेज मुले ते खूप लोकप्रिय देखील झाले आहेत. ह्यावर ते म्हणतात, ‘मी वयाने मोठा असलो तरी मनाने खूप तरुण आहे. कारण हल्लीच्या पिढी सारखे कोणतेच तणाव मी स्वतःवर ओढवून घेत नाही. खूप कठीण परिस्थितीतून मी गेलो आहे पण कधीच हार मानली नाही आणि निराशही झालो नाही. मी सगळ्यांशीच मिळूनमिसळून राहतो. सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर तर रोजच आमचा लाफ्टर क्लब चालतो.

मला कोणतेच व्यसन नाही. फक्त प्रेम आणि कर्म हीच माझी नशा. मी कुठे ही गेलो तरी लहान मुले, तरुण सगळेच माझ्या सोबत सेल्फी घेण्यास उत्सुक असतात आणि मला ते खूप आवडतेही. हे पद्मभूषण सुद्धा ह्याच लोकांचे प्रेम आहे. ह्यात माझं असं काहीच नाही.’

कित्येकदा धरमपालजी त्यांच्या मृत्यूच्या बातम्यातून हसतखेळत बाहेर आलेत. जेव्हा जेव्हा अशा अफवा पसरवल्या जातात तेव्हा तेव्हा ते स्वतः मीडिया समोर उभे राहून ‘ बघा मी किती तंदुरुस्त आहे’ हे सांगण्यास येतात.

वयाच्या पन्नाशीनंतर गलितगात्र होणाऱ्या माणसांसाठी तर हे एक आदर्शच आहेत कारण वय वर्षे ९५ असले तरी हे धरमपाल गुलाटी एक तरुण तडफदार व्यक्तित्वच आहे जणू..!! अशा ‘कूल’ आजोबांना पद्मभूषण साठी स्टार मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!