तिच्यातील जिद्द आणि कठोर परिश्रमापुढे परिस्थितीही झाली नतमस्तक !

0

कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी या लहानशा खेड्यातील आशाताई बाबूराव भुरके या मुलीच्या जिद्दीची ही कहाणी. भुरक्याची वाडी हे डोंगराच्या कुशीत बसलेले आदिवासी गाव.  गावातील ८० टक्के नागरिक दरवर्षी उसतोड कामगार म्हणून भटकंतीवर असतात. त्यामुळे स्थैर्य आणि मुलांचे शिक्षण यावर पालकांचे लक्ष नसते. गावातील अनेकांना हळूहळू शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे.

बाबूराव भुरके यांनाही हे उमगले. तीन मुलांवर शेंडेफळ असलेली आशाताई हिच्यावर प्रचंड जीव. शिवाय तीही कायम बुद्धीची चुणूक दाखवत आली. त्यामुळे ती डॉक्टर व्हावी, ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कष्ट करीत राहिले.  शिक्षणाला पैसा लागू लागल्याने त्यांनी बैल विकला.  तिला अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी नांदेडला ठेवले. खर्च खूप लागत होता. पित्याची, कुटूंबियांची ही कुतरओढ तिला जाणवत होती.

परिस्थितीला शरण न जाता तिच्याशी दोन हात करीत अखंड परिश्रम घेतले. दोन मैत्रिणीत मेसचा एकच डबा लावला. पोटाची भूक अर्धी ठेवून ज्ञानाची भूक पूर्ण केली. या मेहनतीमुळे नीट परीक्षेत चांगले गुण घेऊन एका ऊसतोड कामगाराच्या मुलीने एमबीबीएसचा प्रवेश निश्चित केला आहे. नांदेडला कॉलेजात तासिका होत नव्हत्या. शिकवणीशिवाय पर्याय नव्हता. क्लासेसच्या शिक्षकांना अर्ज, विनंत्या केल्या. परिस्थितीची जाणीव करून दिली.

काहीअंशी फिसमधून सुट मिळविली. आपल्यासारखीच गरजवंत मैत्रीण गाठली. खोलीचे भाडे परवडत नव्हते. विटा रचलेली साधी खोली केली. दोघी मैत्रिणीत मेसचा एकच डबा लावला. एकच डबा दोघींनी दोन वर्षे खाल्ला.  सोयी-सुविधा नसतानाही कठोर परिश्रम करून अभ्यास मात्र नियमितपणे केला आणि नीट परीक्षेत २३४ गुण मिळविले. आज ती एमबीबीएससाठी पात्र झाली आहे.  धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिचा प्रवेश निश्चित झाला आहे. तिच्या जिद्द आणि कठोर परिश्रमाने परिस्थितीलाही नमविले आहे.

 

News Credit : Lokmat

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!