वावर गेल तरी चालीन, पण पावर जायले नको…! हि म्हण मोडीत काढुन डॉ. तुपकरांचा आदर्श विवाह !

0

वावर गेल तरी चालीन, पण पावर जायले नको…! अशी ग्रामीण भागातील प्रचलीत म्हण आहे. या म्हणीनुसार लग्न सोहळे पार पाडणारी कित्येक कुटुंब देशोधडीला लागली आहेत. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ते धुमधडाक्यात मुलांची लग्ने करतात. आमच्याजवळ पैसा आहे, आम्हाला पाहिजे तसे लग्न करु… तुमचे काय बिघडते…? हा धनदांडग्यांचा प्रश्न वरवर योग्य वाटतो. परंतु यातून त्या गावातील- जातीतील गरीब कुटुंबावर एक वेगळ्या पध्दतीचा परिणाम होतो.

आपणसुध्दा किमान तोलामोलाच लग्न पार पाडलं पाहिजे, असा तणाव निर्माण होतो आणि याच तणावातून त्यांच्या नशिबी कर्जबाजारीपणा येतो. लग्नखर्चामुळे होणारा कर्जबाजारीपणा आणि त्यातूनच मग आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. शेतकरी आत्महत्येचा हा सुध्दा एक धागा आहे. काही ठिकाणी तर, आपल्या वडिलांना हुंडा अन लग्नाचा खर्च परवडणार नाही म्हणून उपवर मुलींनी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचीही उदाहरणे महाराष्ट्रात कमी नाही.

अशा पध्दतीने लग्न सोहळ्यांवर अनावश्यक-अनाठायी खर्च होत असल्याने वधु पिता मात्र बाराच्या भावात जात असल्याचे भिषण वास्तव आज समाजात दिसून येत आहे. डॉ. तुपकरांचा आदर्श विवाह एकीकडे लोकापवादाच्या भयाने किंवा समाज बिराजदरीच्या भ्रामक दडपणातून उरली-सुरली इस्टेट विकून लग्नसमारंभ करणारी मंडळी असली तरी दुसरीकडे अल्पखर्चात आदर्श विवाह उरकणारीही मंडळी आहेतच.

5 फेब्रुवारी 2019 रोजी कोल्हापुरात असाच एक आदर्श विवाह करण्यात आला. या विवाहाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. डॉ. सौरभ तुपकर हे स्वतः एम.बी.बी.एस. पदवी घेऊन उच्चशिक्षित आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन आजमितीस ते राधानगरी कोल्हापूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती अगदी उत्तम आहे.

करोडो रुपये खर्चुन शाही पध्दतीने विवाह सोहळा करु शकले असते पण आपल्या समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण व्हावा, ही त्यांची मनस्वी इच्छा होती. आपली ही ईच्छा डॉ. सौरभ यांनी आपल्या घरातील मंडळींना बोलून दाखविली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील अ‍ॅड. तात्यासाहेब सोळंके यांची कन्या डॉ. रोहिणी हीसुध्दा एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेतलेली.

स्पर्धा परिक्षेनंतर त्या पोलीस सेवेत आल्या. आजमितीस डॉ. रोहिणी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील पोलीस उपअधिक्षक आहेत. डॉ. रोहिणी आणि डॉ. सौरभ यांच्या विवाहाचा संकल्प निश्चित झाला आणि लग्न अगदी साधेपणाने आणि कमी खर्चात करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. निर्णयानुसार नोंदणी कार्यालयामध्ये 5 फेब्रुवारी 2019 रोजी विवाह संपन्न झाला.

विवाहाला एकूण खर्च 2 हजार 500 रुपये आला. हा खर्चसुध्दा वधु-वरांच्या मित्रमंडळींनी केला. कोल्हापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी शिवश्री सुंदर जाधव यांनी उभयतांना विवाह प्रमाणपत्र दिले आणि पुस्तकरुपी भेटवस्तू आहेर देऊन दोघांना आशिर्वाद दिले. विवाह समारंभ पार पाडल्यानंतर सर्वांनी जेवणावळीचा आग्रह धरला.

नोंदणी विवाह पध्दतीमध्ये विवाह करतांना डॉ. सौरभ यांचे सोबत 7 तर डॉ. रोहिणी यांचेसमवेत 5 मित्रमैत्रिणी होत्या. अशी ही 14 जणांचे वर्‍हाड मग एका शुध्द शाकाहारी भोजनालयात दाखल झाले. त्या ठिकाणी जेवणावळीचा खर्च 1800 रुपये झाला. त्याआधी वर-वधुंचे हार, बुके, पेढे आदींसाठी 700 रूपये खर्च झाला. हा सर्व एकुण 2500 रूपयांचा खर्च वर-वधु यांनी केला नाही. दोघांच्या मित्रमैत्रिणींना हा अडीच हजाराचा खर्च केला. कोणताही आहेेर नाही, भेटवस्तू नाही, बॅन्ड वाजा बारात नाही.

नवरदेवाचा कोट नाही. नवरीचा शालू नाही, नवरीचा मेकअप करणारी ब्युटीशिअन नाही, शुटींग व फोटोसाठीचा ड्रोन कॅमेरा नाही, संगीत रजनी, ऑर्केस्ट्रा नाही, बुफे नाही. जेवणावळी नाही, मानपान आहेर नाही, वाजंत्री-डीजे नाही, लग्नापूर्वीचे प्री-वेंडींग फोटोसेशन नाही, पत्रिका नाही, हुंडा नाही, भटजी नाही अन् मंगलाष्टकेही नाहीत. आहे त्याच नेहमीच्या कपड्यांवर या आदर्श जोडप्याने नोंदणी पध्दतीने विवाह लाऊन घेतला. आणि मोठा आदर्श समाजासमोर ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!