‘या’ सिनेमामुळे सिनेसृष्टीमधील सेन्सॉरशिपला सुरुवात झाली…
स्टार मराठीच्या वाचकांनो, आज आम्ही तुम्हाला सिनेसृष्टीमध्ये सेन्सॉरशिपचा जन्म कसा झाला ते सांगणार आहोत. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार, कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या ‘सैरंध्री’ सिनेमापासून सेन्सॉरशिप हे नवीन प्रकरण सिनेवर्तुळात रुजू झाले. बाबुराव मेस्त्री उर्फ बाबुराव पेंटर यांनी १९२० साली आपल्या सिनेमांमध्ये स्त्री पात्रे दाखवण्याचे धाडस केले होते. याच सुमारास पेंटर यांचा ‘सैरंध्री’ हा सिनेमा पुण्यातील ‘आर्यन थिएटर’मध्ये दाखवला होता.
भीम आणि कीचक यांच्यातील युद्धाचे दृश्य या सिनेमात दाखवण्यात आले होते. हे युद्धप्रसंगाचे दृश्य पाहून सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांना चक्कर आणि ते तिथेच बेशुद्ध पडले.
कुठल्याही तंत्रज्ञानाशिवाय बाबुराव पेंटर यांनी चित्रित केलेल्या या दृश्यावरून ब्रिटिश सरकारने भारतामध्ये सेन्सॉरशिपला सुरुवात केली. ‘सैरंध्री’ हा सिनेमा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘कीचकवध’ या नाटकावर आधारित होता.
या नाटकाच्या कथेमधून खाडिलकरांनी व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनच्या जुलुमाला विरोध दर्शवला होता. त्याचप्रमाणे तरुणांनी एकत्रित येऊन कीचकाप्रमाणे लॉर्ड कर्झनचा वध करण्याचे आवाहन तरुणांना दिले.
ब्रिटिश सरकारला या नाटकामागचा हेतू समजल्यावर त्यांनी नाटकावर बंदी घातली. ‘सैरंध्री’ सिनेमातील कीचक वधाचे दृश्य सिनेमात न दाखवण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने सेन्सॉरशिपअंतर्गत दिले. त्यामुळे ‘सैरंध्री’ सिनेमापासूनच भारतामध्ये सेन्सॉरशिपला सुरुवात झाल्याचे म्हटले जाते.