ज्या गंगू तेल्याच्या नावावर आपण दुसऱ्याची खिल्ली उडवतो, तो कोण होता ते माहीत आहे का..?

0

स्वतःच्या श्रीमंतीच्या, मोठेपणाच्या फुशारक्या मारण्यासाठी आपण सहज म्हणून जातो, “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली..!!” म्हणजे ह्या मागे स्वतः कोण्या देशाचा राजा असल्याचा आणि समोरचा कोणी तुच्छ तेली म्हणजे अगदीच लहान माणूस असल्याचा अविर्भाव असतो. गोविंदा आणि कादर खान ची तर जुगलबंदीच रंगली होती ह्या म्हणीच्या गाण्यावर.. ऐकायला मजेशीर असलेले हे बोल म्हणजे खऱ्या ऐतिहासिक पात्रांवर बनवलेली म्हण आहे…!! ह्यातील राजा भोज बद्दल तर सगळ्यांना माहीतच असेल मात्र गंगू तेली नक्की होता तरी कोण..??

काय म्हणता तुम्हाला माहीत नाही..?? हरकत नाही.. आज आम्ही तुमच्यासाठी राजा भोज आणि गंगू तेली ह्या दोघांचीही माहिती आणली आहे.

तर कोण होता हा राजा भोज..?


ह्या राजा भोज ची स्वतःची ‘राजा भोज नगरी’ होती बरं का.. मध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ पासून अडीचशे किलोमीटरवर धार नावाचे नगर वसले होते. अकराव्या शतकात हे नगर मालवा साम्राज्याची राजधानी होते. हे मालवा साम्राज्य आणि मध्य भारतातील अजून काही भाग राजा भोज ह्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे ह्या नगरीला तिच्या राज्यकर्त्यांचे म्हणजेच राजा भोज ह्यांचे नाव देण्यात आले. अत्यंत पराक्रमी असलेला हा राजा, शस्त्रांचीच नाही तर शास्त्रांची सुद्धा पारख आणि अभ्यास असलेला राजा होता असे इतिहास सांगतो. ह्या राजाला वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद आणि हिंदू धर्माचे वेद ह्या सगळ्यांचेच ज्ञान होते. त्यांनी स्वतःच्या अभ्यासातून कित्येक पुस्तके आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. ह्या राज्यकर्त्याने आपल्या शासन काळात भरपूर मंदिरे आणि इतर इमारती बांधल्या होत्या. बौद्धिक आणि धनसंपत्ती ह्या दोन्ही मध्ये सपन्न असलेला असा हा राजा होऊन गेला.

मग एवढ्या महान राजाबरोबर तुलना करू पाहणारा हा बापडा गंगू तेली होता तरी कोण..?

तर त्याचे असे आहे की हा गंगू तेली ही एकच व्यक्ती नसून २ व्यक्ती आहेत आणि ह्यातील कोणीही ‘तेली’ म्हणजे तेल्याच्या व्यवसाय करणारा गरीब वाटेल असा माणूस नाहीच मुळी. आहे की नाही गंमत..??!!

तर ‘कहानी मे ट्विस्ट’ ये है की गंगू म्हणजे दक्षिणेकडील राजा ‘गांगेय’ तर तेली म्हणजे चालुक्य सम्राट ‘तैलंग’..!! हे गांगेय आणि तैलंग दोघेही भोज राजाचे शत्रू होते. राजा भोज चे साम्राज्य मिळवण्यासाठी हे दोघे सतत मालवा साम्राज्यवर चालून जात असत. सारखे हल्ले करत असत. मात्र बलाढ्य आणि शक्तिशाली अशा राजा भोज समोर ते कायम हतबल होत असत. राजा भोजच्या पराक्रमा पुढे त्यांचे काही एक चालत नसे. दर वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागत असे. तरीही हे दोघे जेरीस मात्र येत नसत.. कुत्र्याची हेपत वाकडी ती वाकडीच.. ह्या प्रमाणे सतत काहीतरी कुरापती उकरून काढून हे लढाई सुरू करत आणि हरले की काळे तोंड घेऊन परत जात असत.. ह्या दोघांच्या ह्या पराभवाची खिल्ली उडवण्यासाठी ‘धार’ (मालवा) प्रांतातील लोकांनी एक म्हण प्रचलित केली की ,’काहां राजा भोज, काहां गंगू तेली..!’ म्हणजे गांगेय झाला गंगू आणि तैलंग झाला तेली.. अरेरे कितीही मानहानी..!! आणि तेव्हा पासूनच ही म्हण सर्रास वापरली जाऊ लागली.

ह्याच म्हणीबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे ती अशी की,
राजा भोजाच्या महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ल्याची एक भिंत सतत पडायची. त्यावर कोण्या निर्बुद्ध व्यक्तीने एक उपाय सुचवला की ‘आई आणि तिच्या नवजात बालकाचा’ बळी दिल्यास ही भिंत कोसळणार नाही. आणि त्या गावातील गंगू नावाच्या तेली ने स्वतःच्या ‘पत्नी आणि बाळाची’ कुर्बानी दिली. हे पाशवी कृत्य करून तो स्वतः खूपच मिजास दाखवू लागला आणि त्यांच्या ह्या घमेंडीवर ‘कहा राजा भोज, काहां गंगू तेली’ अशी म्हण लोकांनी प्रचलित केली. मात्र कोणीही इतिहासकार ह्यावर शिक्कामोर्तब करीत नाही. त्यामुळे ह्या कथेला १०० % मान्यता नाही. पहिलाच किस्सा इतिहासकारांनाही मान्य असल्याने तोच ग्राह्य धरला जातो.

तर मंडळी आता ह्या गंगू विषयी तुम्हाला कळालेच आहे तर ही पोस्ट अजून शेअर करून आपल्या दोस्तमंडळींनाही ह्या गोष्टीची मजा घेऊ द्या.. आणि ‘शहाणे करून सोडा सकळ जन..!!’

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!