गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवानी बावकरच्या चाहत्यांना मिळणार ही खुशखबर !

झी टॉकीज ही मराठी चित्रपटांच्या बरोबरीने, इतर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील झी टॉकीजवर प्रदर्शित होतात. या कार्यक्रमांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘मन मंदिरा’ हा किर्तनावर आधारित कार्यक्रम यातीलच एक आहे. गुढीपाडव्याचा दिवस आता जवळ आलेला आहे. हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस, मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

प्रत्येक हिंदू बांधव, गुढी उभारून, मोठ्या आनंदाने, नव्या वर्षाचे स्वागत करतो. या शुभमुहूर्तावर ‘झी टॉकीज’ वाहिनीवरील ‘मन मंदिरा’ या कीर्तनाच्या कार्यक्रमात सुद्धा एक नवी गोष्ट घडणार आहे. या दिवसापासून एक नवा सूत्रसंचालक या कार्यक्रमाला मिळणार आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्री शिवानी बावकर, ‘मन मंदिरा’च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती महाराष्ट्रभरातील अनेक धार्मिक स्थळांना आणि मंदिरांना भेट देणार आहे. ‘मन मंदिरा’ हा कीर्तनाचा सोहळा आता शिवानीच्या साथीने रंगणार आहे.

याविषयी बोलताना ती म्हणते; “एक अभिनेत्री म्हणून मला प्रेक्षकांनी आजवर पाहिलेले आहे. ‘मन मंदिरा’च्या निमित्ताने माझ्यातील इतर पैलू सुद्धा त्यांना पाहायला मिळतील. ही माझ्यासाठी एक नवी सुरुवात आहे. एका दर्जेदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली आहे. ही नवी सुरुवात, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे, ही आणखीनच आनंदाची बाब आहे. नवीन वर्षाचे आणि नव्या भूमिकेचे एकाचवेळी स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अभिनेत्री म्हणून माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांकडून मला या नव्या भूमिकेसाठी सुद्धा तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद लाभेल याची मला खात्री आहे.”