हा होता फ्लिपकार्टचा पहिला ग्राहक, फ्लिपकार्टने ‘अशी’ पूर्ण केली त्याची ऑर्डर
सध्याचा जमाना ऑनलाईन शॉपिंगचा आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर आज आपल्याला हव्या त्या गोष्टी घराबाहेर न पडता उपलब्ध होत आहेत. सध्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अग्रेसर आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला फिलपकार्टला त्यांचा पहिला ग्राहक कसा मिळाला हे सांगणार आहोत. २००७ मध्ये म्हणजेच १२ वर्षांपूर्वी मेहबूब नगरचे रहिवासी असलेले विविके चंद्रा हे जॉन वुड यांच्या ‘लिविंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड’ या पुस्तकाच्या शोधात होते.
फ्रिलान्स वेब कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या विविके यांना लिहिण्याचा छंद होता. चंद्र यांनी हैद्राबादमधील अनेक पुस्तकांच्या दुकानात जॉन वुडच्या या पुस्तकाचा शोध घेतला. मात्र त्यांना पुस्तक काही मिळाले नाही.
यावेळी चंद्रा यांनी त्यांच्या ब्लॉगवर हे पुस्तक न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये एक वाचकाने फ्लिपकार्टची लिंक शेअर केली होती. त्यानंतर चंद्रा यांनी फ्लिपकार्टच्या लिंकवर जाऊन पहिले तेव्हा त्यांना हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले.
ही वेबसाईट देशातील अनेक भागांमध्ये ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू पोहोचवण्याचे काम करते हे समजले. चंद्रा यांना हव्या असलेले पुस्तक फ्लिपकार्टवर ५०० रुपयांना उपलब्ध होते.
त्यामुळे या वेबसाईटवरून पुस्तक मागवण्यास हरकत नाही असे मनाशी ठरवून त्यांनी फ्लिपकार्टवर ऑर्डर दिली. इथे फ्लिपकार्टला या पुस्तकाची ऑर्डर मिळाली त्यावेळी त्यांच्याकडे एकही पुस्तक शिल्लक नव्हते.
आणि आपल्या ग्राहकाला निराशा करणे हेही फिलपकार्टला पसंत नव्हते. त्यामुळे फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बंसल व बिन्नी बंसल यांनी या पुस्तकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर हे पुस्तक बंगळुरूमधील एका पुस्तकांच्या दुकानात सापडले.
बिन्नी बंसल स्वतः हे पुस्तक खरेदी करण्यास बंगळुरूला गेले त्यादरम्यान तेथे खूप पाऊस पडत होता. जागोजागी पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढत पुस्तकाच्या दुकानात पोहोचलेल्या बिन्नी बंसल यांना आपण पैशांचे पाकीट घरीच विसरल्याचे लक्षात आले.
त्यावेळी त्यांनी आपल्या मित्राकडून उसने पैसे घेऊन हे पुस्तक खरेदी केले. ३१ ऑक्टोबर २००७ ला बिन्नी बंसल यांनी हे पुस्तक विविके चंद्रा यांच्या पत्त्यावर पुस्तक पाठवले. त्यासोबतच पुस्तक उशिरा मिळाल्याबद्दल दिलीगिरी मेलही त्यांनी चंद्रा यांना पाठवला होता.