सैन्य भरतीसाठी येणाऱ्या मुलांना मोफत जेवण देणारा पुण्यवंत कोल्हापूरकर !

0

‘हाऊ इज द जोश’ ? व्हेरीच हाय की…… अभिमान वाटतो तो कोल्हापुरातल्या ह्या पुण्यवान व्यक्तींचा. होय कीssss ……. व्हेरीच हायरे बाबा. कोल्हापूरात पाहायला मिळाला हा जोश. त्याचं काय झालं…सकाळपासूनच एकदम रस्त्यावर तरुण पोरांची गर्दी दिसायला लागली. नवीन नवीन चेहेरे दिसायला लागले. कोण बिहारी, तर कोण राजस्थानी, तर कोण ग्रुप करून यू पी तून आले होते. त्यांच्या तोंडावळ्यावरूनच कळत होतं. काही जण आले होते यवतमाळ, नांदेड, उस्मानाबाद, तर काही आले होते हिमाचल प्रदेशातून. काही सांगली, कोल्हापुरातले पण असतील, अशी सगळी सरमिसळ होती.

एवढी मंडळी एकदम कशासाठी आली होती काही कळत नव्हतं. सगळ्यांच्या हातात ब्यागा होत्या म्हणजे मुक्काम करणार का काय? असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला असणार. रस्ताभर सगळीकडं गर्दी वाढायला लागली होती. कोणी झरोक्स करून घेत होतं तर कोणी आपली सगळी कागदपत्र काढून चेक करत होते. इकडून तिकडं धावपळ चालू होती. पण सगळी मंडळी अख्या भारतातून एकाच कामा साठी आली होती. आणि ते काम म्हणजे ” सैन्य भरती”.

ही सैन्य भरती दुसऱ्या दिवशी होणार होती, रात्र झाल्यावर फुटपाथवरच पथाऱ्या टाकून झोपले ना हे सगळे तरुण. पण १२ची वेळ टळल्यावर सगळ्यांच्या पोटात खड्डा पडायला सुरुवात झाली असणार. जो तो मिळेल त्या हॉटेलात घुसून पोटापाण्याचं बघत होता. आता एवढी गर्दी हॉटेलात घुसल्यावर काय शिल्लक राहणार? हॉटेलवाले दमले, परत परत सगळे पदार्थ बनवून, पण गर्दी काही हटत नव्हती. हॉटेलवाल्यांनी चांगलाच फायदा करून घेतलाकीहो.

पण ह्या सगळ्या गर्दीत गरीब घरची पण पोरं होती ना त्यांनी परवडतील अशी हॉटेलं शोधायला सुरवात केली. आणि पोचले एका हॉटेलपाशी. बाहेरूनच काउंटरवर चौकशी केली त्यांनी , ‘राईस प्लेट चा रेट किती’ ?……. कौंटरवरून प्रेमानं उत्तर आलं…. या आत बसा, खाऊन घ्या पोटभर, बिलाची नका काळजी करू. कोल्हापुरी आदरातिथ्य होतं ते. पण मुलांनी परत विचारलं , ‘ तसं नाही काका, आम्ही एका हॉटेलात गेलो होतो आधी, पण त्यांनी राईस प्लेट चा भाव डबल केला एवढी गर्दी बघून, पार २०० रुपये सांगायला लागले, म्हणून आम्ही आधीच चौकशी केली.’

तेंव्हा कौंटरवरून पुन्हा उत्तर आलं, अरे बाबांनो तुमच्या कडं पैसे असतील तर द्या आमची राईस प्लेट ७० रुपयांची आहे. वाढवणार नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर देऊ नका पण उपाशी राहू नका, आत या, पोटभर जेवा, पैशाची काळजीच करू नका. त्या सैन्य भरती साठी आलेल्या मुलांना हायसं वाटलं.

त्या हॉटेलमध्ये खूप मोठी गर्दी उसळली. सगळ्या कामगारांची थोडी गडबड उडाली, माणूस बळ कमी पडलं, हॉटेल मालकांकडे काही घरचे पाहुणे आले होते त्यांनी सुद्धा मदत केली, पण माणसं कमी पडल्याची खंत हॉटेल मालकांना वाटली. पण सगळ्यांना जेवण पुरवल्याचा आनंद झाला. कोणत्याही मुलाला त्यांनी पैसे विचारले नाहीत. पण ज्यांच्याकडे पुरेसे पैसे होते त्यांनी काउंटरवर येऊन दिले. ज्यांच्याकडे कमी होते त्यांना सूट दिली. पण थँक्स म्हणायला ती मुलं विसरली नाहीत.

सैन्य भरतीला आलेले हे तरुण निश्चितच चांगले नागरिक असतात, आणि भरती नंतर हेच तरुण आपल्या देशाचं रक्षण करणार आहेत, आपल्या जीवाची पर्वा न करता जीवावर उदार होऊन देश सेवा करणार आहेत ह्या उदात्त हेतूनं ह्या हॉटेलच्या मालकाने ह्या सगळ्या भावी शूर वीरांना आपुलकीने जेवू घातले. ही आहे कोल्हापूरची अगत्याची पद्धत. कोण आहेत ह्या हॉटेलचे पुण्यवान मालक? त्यांचं नाव आहे श्री सुधांशू नाईक आणि त्यांची पत्नी सौ. अनिता नाईक. कोल्हापूरमधल्या “खमंग उपहारगृहाचे” हे मालक आहेत, आणि त्यांना ऐनवेळी मोलाची मदत करणारी पाहुणे मंडळी म्हणजे मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, आणि सीमा पाटील.

पुलवामा सारख्या धक्कादायक हल्ल्यात आपले प्राण सुद्धा जाऊ शकतात हे माहिती असून सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने हे तरुण सैन्यात भरती होण्यासाठी येतात, त्यांना आपण कोणताही स्वतःचा फायदा न बघता पोटभर जेवू घातलं, ह्यात धन्यता मानणारे हे नाईक पती पत्नी आणि त्यांना मदत करणारे पाहुणे ह्यांना शतशः प्रणाम. आपल्या सैनिकांच्या बाबतीत हीच भावना सर्व भारतीय नागरिकांनी ठेवावी अशी ह्या नाईक कुटुंबाची इच्छा आहे. त्यांच्या ह्या कार्याला मनापासून शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!