चालता चालता सहज भेटणारा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही..!! मनोहर पर्रीकर एक असामान्य राजकारणी..

0

रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्कुटर वाल्या माणसाला एक कारने येऊन धडक दिली. स्कुटरवाल्या माणसाला पाहायला कार मधला श्रीमंत घरातील मुलगा उतरला आणि स्कुटर वाल्या सामान्य माणसाला म्हणाला, ‘मी कमिशनरचा मुलगा आहे..’ ह्यावर स्कुटरवाल्या माणसाची प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होती.. तो माणूस उत्तरला, ‘मी ह्या गोव्याचा मुख्यमंत्री आहे..!’ ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ ही एखाद्या राजकारण्याला अजिबात शोभणारी नाही अशी म्हण..!!

पण पर्रीकर साहेबांवर मात्र चपखलपणे शोभते.. साधे कपडे, लहान घर, छोटा व्यवसाय, एक स्कुटर पण शिक्षण मात्र आय आय टी.. असे मनोहर जी पर्रीकर हे असामान्य राजकारणी होते. त्यांच्या जाण्याने, त्यांच्या ह्या चटका लावून केलेल्या एक्झिट मुळे आज प्रत्येक भारतीय हळहळतोय.. काय नाही केलंय ह्या माणसाने त्यांच्या कामाखातर..!!?

पक्षाचे आणि संघाचे, गरज पडेल तेव्हा २४ – २४ तास अथक काम त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री आणि सुरक्षा मंत्री अशी दोन्ही पदे खंबीर रित्या सांभाळली इतकेच नाही तर आता शेवटच्या काळात कॅन्सरमुळे तब्येत गंभीर असतानाही आपल्या कामामध्ये कसलाही कसूर त्यांनी ठेवला नाही. नाकातील नळ्या, औषधे , डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत घेत त्यांनी आपले काम अगदी काल पर्यंत सुरूच ठेवले.

तुम्हाला माहीत आहे का सध्याच्या सरकार मध्ये राहून त्यांच्या पुढाकाराने झालेले निर्णय सैन्याला आणि आपल्यालाही खूप फायदेशीर ठरत आहेत.. त्यांच्या अखत्यारीत बरेच निर्णय घेतले गेले आणि ते नुसते कागदोपत्रीच न राहून अस्तित्वात आले. त्यांच्यामुळे मुलींसाठी सैनिक शाळा उघडल्या गेल्या. ‘वन रँक वन पेन्शन’ ह्या साठी कित्येक वर्षे वाट बघणारे सैनिक आता ह्या निर्णयाचा पुरेपूर लाभ घेताना दिसत आहेत.

सैनिकी पेशामधली पदोन्नती ही कोणत्याही गैरव्यवहार विरहित ठेवण्यास पर्रिकरांनी प्रोत्साहन दिले. शहिदांच्या कुटुंबियांना दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय त्यांच्याच मुळे झाला.. सैनिकांना मिळालेली बुलेट प्रुफ जॅकेट सुद्धा पर्रिकरांच्या अथक पाठपुराव्यामुळे..!! S ४०० मिसाईल डील, उरी चा सर्जिकल स्ट्राईक ह्या सगळ्यामध्ये पर्रिकरांच्या योगदान महत्त्वपूर्ण आहेच.

इतकेच नाही तर टॅक्स भरणाऱ्यांचे ४९३०० करोड रुपये वाचवण्यामध्ये सुद्धा पर्रिकरांचे नियोजनच कामी आले.. पर्रिकरांनी कायमच आपल्याला दिलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली. मात्र कामाप्रमाणे स्वतःच्या तब्येतीकडेही थोडे लक्ष दिले असते तर कदाचित आपल्याला त्यांचा सहवास अजून लाभला असता. पण कॅन्सर ह्या दुर्धर आजाराने मात्र आज हिऱ्यासारखा माणूस आपल्यातून नेला.

हा जनतेचा नेता जनतेमध्ये सहजपणे राहून अतिशय प्रामाणिकपणे काम करत राहिला..!! एक निस्पृह राजकारणी म्हणून त्यांची छबी कायम लोकांच्या स्मृतीत राहील.. मनोहरजी पर्रिकरांसारखा नेता पुन्हा होणे नाही.. ही सल कायम सगळ्यांच्या मनात राहील.. स्टार मराठी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!