आर्थिक परिस्थितीपुढे हतबल झालेल्या MBBS विद्यार्थ्याला पंकजा मुंडेंची मदत !

0

उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने व्यथित होऊन विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर येतात. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले गुण मिळवूनही पैशांअभावी उच्चशिक्षणापासून वंचित रहावं लागतं. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका होतकरु विद्यार्थ्याने चांगले गुण मिळवूनही डॉक्टर बनण्याचं स्वप्न (MBBS admission) पूर्ण होईल की नाही ही धाकधूक होती. पण याबाबतचं वृत्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी वाचलं आणि त्याला तातडीने दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भोगजी येथील गोरख मुंडे या विद्यार्थ्याने NEET परीक्षेत चांगले गुण मिळवले. गोरखने 505 गुण मिळवून देशपातळीवर 46342 आणि राज्यस्तरावर 3888 रँक मिळविली. त्याचा सोलापूर येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. गोरख हा गावातला एमबीबीएसला लागलेला पहिलाच मुलगा ठरला. पण आर्थिक अडचणीमुळे गोरख हतबल झाला.

गोरखला ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता तेथील 4 लाख 66 हजार रूपये शैक्षणिक शुल्क आणि इतर खर्चाची रक्कम आगामी पाच दिवसात भरावी लागणार होती. अन्यथा त्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार होता. या परिस्थितीत वडील तुकाराम आणि गोरख दोघेही हतबल आहेत. चौथीला असतानाच आईचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वडिलांनीच आई आणि वडील या भूमिकेत लेकरांना सांभाळलं. पण उच्च शिक्षण घेण्याची वेळ आली तेव्हा परिस्थितीसमोर हात टेकावे लागले.

गोरखच्या सर्व परिस्थितीची बातमी एका वेबसाईटवर देण्यात आली होती. हीच बातमी पंकजा मुंडे यांनी वाचली आणि त्यांनी संबंधित पोस्टवर कमेंट करुन मदत जाहीर केली. “कृपया माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा. आपला प्रश्न मला व्यथित करतोय… मी माझ्या परिने सोडवण्यासाठी प्रयत्न करते.. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आपल्या पुढील शिक्षणासाठी रु 1 ,51,000 ची मदत आपल्याला करण्याची इच्छा आहे”, अशी कमेंट पंकजा मुंडे यांनी केली.

पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने संबंधित मुलाचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्कही साधलाय. त्यामुळे त्याला ही मदत मिळणार आहे. गोरख ज्या महाविद्यालयात शिकला त्या मोहेकर महाविद्यालयानेही 50 हजार रुपयांची मदत दिल्याची माहिती आहे. या होतकरु विद्यार्थ्यासाठी आणखी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!