‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मधील या छोट्या स्पर्धकाची चाहती बनली नेहा कक्कर!

‘झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील गायनकलेचा शोध घेणार्‍्या ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रिअलिटी कार्यक्रमाने लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 18 जुलै रोजी पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा नवा भाग असो की गेल्या वीकेण्डचा पौराणिक विशेष भाग असो, त्यातील गुणी बालस्पर्धकांनी अत्यंत अप्रतिमपणे सादर केलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

पण आता या आठवड्यात प्रेक्षकांना यापेक्षाही अधिक मोठी श्रवणपर्वणी लाभणार आहे कारण रक्षाबंधनाच्या या विशेष भागात प्रसिध्द कक्कर भावंडे- नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि सोनू कक्कर- सहभागी होणार असून ते या स्पर्धकांना प्रोत्साहन देतील.

या कार्यकमातील प्रत्येक बालस्पर्धकाने आपल्या सुरेल आवाजाने कक्कर भावंडांवर आपला प्रभाव टाकला असला, तरी लहानग्या आर्यनंदाने विशेष करून नेहा कक्करचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आर्यनंदाने ‘दंगल’ चित्रपटातील नेहाचे सुपरहिट गाणे ‘नैना…’ जसे गायले, ते ऐकून नेहाला तिची प्रशंसा केल्यावाचून राहावले नाही. “तुझं गाणं ऐकल्यावर दुसरा कोणताही गायक मनातून धास्तावूनच जाईल,” असे नेहाने तिला सांगितले.

पण केवळ इतकेच बोलून ती थांबली नाही; तर आपण आर्यनंदाची चाहती बनलो आहोत, असे सांगून तिने तिच्याबरोबर एक सेल्फीही काढला. “या भावी गायकाची माहिती मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे,” असे सांगून तिने आर्यनंदाची प्रशंसा केली. आर्यनंदाचे गाणे ऐकून भारावून गेलेल्या हिमेश रेशमियानेही आपला आनंद व्यक्त केला. तिला तिच्याच मल्याळी या मातृभाषेत शाबासकी देण्यासाठी हिमेशने तिचीच मदत घेतली!

आता कक्कर भावंडे ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे हा रक्षाबंधनाचा विशेष भाग अधिकच संगीतमय झाला आहे. त्यात काही गुणी लिटल चॅम्प्सकडून अप्रतिम गाणी सादर करण्यात आली. बॉबी आणि सौम्या यांनी यावेळी ‘फूलों का तारों का’ हे बहीण-भावांवरील सुपरहिट गाणे सादर केले, तर झैद अलीने ‘मेरे रश्के कमर’ हे गीत खणखणीत आवाजात गाऊन सर्वांची मने जिंकली. एकंदरीतच ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या या भागात प्रेक्षकांच्या अनेक सुखद आठवणी जाग्या होतील आणि सुरेल आवाजातील गाण्यांनी त्यांचे कान तृप्त होतील.

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चा रक्षाबंधन विशेष भागात नेहा, हिमेश आणि जावेद अली यांना पुन्हा एकदा एकत्र येताना पाहा शनिवार-रविवारी रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!