जाणून घ्या स्त्रियांमधील मासिक पाळी आणि मूड बदलाचा संबंध

मूड स्विंग्स ही स्त्रियांमध्ये आढळणारी अत्यंत सामान्य गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा मूड क्षणात बदलतो. मासिक पाळीच्या काळात तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ह्यामुळे त्यांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना बऱ्याचदा त्रास होतो. पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळं होत असतं त्यांच्यात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे. चला जाणून घेऊया नक्की काय होतं या काळात आणि त्याचा परिणाम मूडवर कसा होतो ते.

मासिक पाळीच्या चक्रात (महिनाभराच्या सायकल दरम्यान )इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या हार्मोन्सची पातळी कमी आणि जास्त होते ज्याचा मेंदूच्या रसायनांवर म्हणजे न्यूरोट्रांसमीटरवर जसे की सेरोटोनिन आणि डोपामाईन ह्यांवर परिणाम होतो. ह्यामुळे मूड स्विंग्स दिसून येतात.

सेरोटोनिन आणि डोपामाईन ह्यांची पातळी खालावली की दु:खी वाटणे,चिंता,चिडचिड, झोपेची समस्या, भकभक होणे अशी लक्षणे दिसू लागतात. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी इस्ट्रोजेनची पातळी अत्यंत कमी असल्याने ही लक्षणे दिसून येतात. दुसऱ्या दिवसापासून ही इस्ट्रोजेनची पातळी हळूहळू वाढू लागते म्हणून आपोआप नंतर मूडदेखील चांगला होत असल्याचे दिसून येते आणि आरामदायक वाटते.

सातव्या दिवसापर्यंत मूड सामान्य झालेला दिसून येतो. ह्या काळात काहीसे आशावादी वाटू शकते. त्यानंतर एस्ट्रोजेनची पातळी 8-11 दिवसांपर्यंत वाढत जाते आणि बाराव्या किंवा तेराव्या दिवशी ती उच्च पातळीवर असते. इस्ट्रोजेनचे हे उच्च स्तर आपल्याला अधिक आत्मविश्वास देतात, आपली त्वचा चमकदार बनवतात.

चौदाव्या दिवसापर्यंत स्त्रीबीजांड हे फलित होण्यासाठी तयार असते. ह्या काळात अतिउत्साही वाटू शकते. परंतु जर स्त्रीबीजांड फलित झाले नाही तर साधारण विसाव्या दिवशी म्हणजे तिसऱ्या आठवड्यात अंडाशय इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करणे हळूहळू बंद करतात. त्यामुळे मूडमध्ये बदल दिसून येण्यास सुरुवात होते. ही लक्षणे पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत राहू शकतात.

सतत होणाऱ्या ह्या मूड स्विंग्सचा शरीरावर आणि कामावर परिणाम दिसून येतो. ह्यावेळी शरीरात होणाऱ्या बदलांमुळे शरीराला ऊर्जेची आणि आरामाची गरज असते. त्यामुळे सकस आहार, योग्य व्यायाम, ताण न घेणे ह्या गोष्टी पाळल्या की आराम मिळण्यास मदत होते.