ऋषी कपूर यांनी २ वर्षांपूर्वी रागात केलेलं ट्वीट खरं ठरलं..‌. बघा काय होतं ‘ते’ ट्वीट…

पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ बॉलिवुडमध्ये विविध चित्रपटांतून भूमिका साकारुन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेता ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. फिल्मफेयर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, झी सिने पुरस्कार नावावर असलेल्या या अभिनेत्याने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत चित्रपटांमध्ये आपले योगदान देणा-या या अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांचे एक ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. बघूया काय म्हटले होते या ट्वीटमध्ये…

२०१७ मध्ये विनोद खन्ना या अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन झाले. ऋषी कपूर यांचा सहकलाकार व घनिष्ठ मित्र असलेल्या या अभिनेत्याच्या निधनाने ऋषी कपूर यांना धक्का बसला. त्या दोघांनी चांदनी, इना मिना डिका अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या होत्या. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज कलाकार उपस्थित होते मात्र नवीन कलाकारांनी अनुपस्थिती दर्शवली.

त्यावर नाराज झालेल्या ऋषीजींनी २७ एप्रिल २०१७ रोजी रात्री उशिरा रागाच्या भरात ट्वीट केले. त्यात त्यांनी म्हटले, ” आजच्या पिढीतील एकाही कलाकाराने विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही. ज्यांच्यासोबत त्यांनी काम केलेले अशाही अभिनेत्यांनी पाठ फिरवली. आदर करायला शिका!”

त्यानंतरच्या ट्वीटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ” माझ्या मृत्यूवेळी माझी तयारी हवी. कोणीच मला खांदा देणार नाही. आजच्या पिढीतील ‘स्टार’ म्हणवून घेणा-यांवर मी खूप नाराज आहे.” त्यांनी हे ट्वीट रागात केले असले तरी कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन असताना ऋषी कपूर यांचे ट्वीट एका अर्थाने खरे ठरले. मरीन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीत ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचा परिवार, जवळचे मित्र असे फक्त २० लोक उपस्थित होते. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी ही दिल्लीत असल्यामुळे पतीसह मुंबईमध्ये पोहोचायला तिला उशिर झाला. लॉकडाऊनमुळे त्यांचे अनेक मित्र, परिवारातील इतर सदस्य व चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याचे अंतिम दर्शनही घेऊ शकले नाही. रागात केलेले दोन वर्षांपूर्वीचे ट्वीट आता बरेच व्हायरल होत असून आयुष्यात अनिश्चितता असते, याचीच ते प्रचिती देत आहे…!!!

© Nikita Patharkar