राहुल गांधींनी कधीही फसवी आश्वासनं दिलेली नाहीत – खासदार संजय राऊत

0

राहुल गांधी मला आवडतात. आणि हे मी आज नाही सांगत, यापूर्वी ही मी हे बोललोय. त्यांनी कधीही फसवी आश्वासनं दिलेली नाहीत. राहुल गांधी यांची नेहमी थट्टा केली जाते. पण गांधी घराण्याने देशासाठी जो त्याग केलाय तो आपण विसरून चालणार नाही. तुम्हाला त्यांची धोरणं पटत नसतील तर त्यावर टीका करा परंतु कुणावर व्यक्तिगत टीका करणे आपल्याला मान्य नाही.

सध्याच्या घडीला राजकारण विखारी होत चाललंय. विष जास्त फुत्कारणारा नेता जास्त लोकप्रिय असा लोकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे, असे मत ज्येष्ठ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात मांडले. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या आपल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने कलर्स मराठीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाचे सूत्रधार मकरंद अनासपुरे यांनी संजय राऊत यांना राजकारणामुळे नाती दुरावतात का, असा प्रश्न केला असता त्यांनी होकार दिला. परंतु राजकारणात मतभेद असतील तरी नाती दुरावली जाऊ नयेत, असे मला तरी वाटते. याआधीही अनेकदा राजकारणामुळे नाती दुरावल्याची उदाहरणे पाहायला मिळाली आहेत.  ते पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे असे नेते आहेत, जे सर्वाना एकत्र घेऊन पुढे गेले.

अडचणीच्या वेळेस जात, धर्म, राजकीय पक्ष न पाहता लोकांच्या पाठीशी उभं रहाण्याचे धारिष्ट्य ते अनेकदा दाखवत. बाळासाहेब यांच्यासारखा थोर नेता होणे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्या गोष्टी खटकतात, यावर उत्तर देताना राऊत यांनी सांगितले की, मधल्या काळात त्यांनी शिवसेनेवर अकारण टीका करायला सुरुवात केली होती. शिवसेना राजकारणात उभीच राहू नये असा प्रयत्न त्यांनी केला, तो मला खटकला.

२०१४ नंतर त्यांचे घोडे उधळले. पण राजकारणात कुणालाही कधीही ब्रेक लागू शकतो. आम्हालाही तो अनेकदा लागला. पण म्हणून राजकारणात कुणीही संपत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ चा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी २५ जानेवारीला रात्री सडे नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!