तुमचा खासदार तुमच्यासाठी काय काय करणार आहे..?? आजच माहीती घ्या.

0

नमस्कार मंडळी..! ताई, माई आणि अक्का, मामा आणि काका, तुमचा खासदार आज तुमच्या दाराशी आलाय.. तुमच्या साठी मी अ, ब, क, ड इतकी कामं करणार आहे.. तर मग मंडळी मतदान करताना लक्षात ठेवा माझ्याच निशाणीवर शिक्का मारा..!! नव्हे नव्हे आता सगळं कसं डिजिटल आहे मग माझ्याच निशाणीवरचं बटन दाबा..!! बोला तर मंडळी अमुक तमुक साहेबांचा विजय असो..!! हमरा नेता कैसा हो..?? अमुक तमुक साहेब जैसा हो..

 

 

सध्या सगळीकडेच निवडणुकीचे हे वारे जोरदार वाहत आहेत.. जो तो आपल्या लाडक्या नेत्याला पाहायला उडया मारत आहे.. जिथे जागा मिळेल तिथून त्या नेत्याची सभा पहिली जात आहे आणि नेत्याचे भाषण ऐकले जात आहे. काही जण पूर्वीच्या केलेल्या कामांवर मत मागत आहे तर काही जण नव्याने संधी द्या म्हणून मतदारापुढे नाक घासत आहे. अर्थात एकदा ह्या निवडणूका पार झाल्या की पुन्हा साहेब , ताई, मॅडम काही तुमचे तोंड पाहायला तुमच्या दारात येणार नाहीत. तरीही तुमचे काम करायला ते सगळे बांधील आहेत. कारण पुढच्या ५ वर्षांनी पुन्हा त्यांना तुमचा म्हणजेच माय बाप मतदारांचा सामना करायचा आहे..

 

आता आपल्याला तर हे माहीतच आहे की ह्या निवडणुका लोकसभेसाठी होत आहेत. म्हणजे तुमचे नेते लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाणार. सत्ता स्थापणार, किंवा विरोधात बसणार.. पण त्यांचे स्थान काहीही असले तरी त्यांच्या मतदार संघातील सगळी कामे त्यांना करावीच लागतील. त्यासाठी खास निधी देखील राखला जातो. ज्याचा उपयोग स्वतःसाठी न करता आपल्या मतदारांसाठी त्या नेत्याने करायचा असतो. तर मंडळी आज आपण पाहुयात तुमचे हे खासदार तुमच्या साठी काय काय करणार आहेत ते..

 

 

खासदाराची कर्तव्य: १. सरकार मध्ये राहून असेल किंवा विरोधकांच्या खुर्चीवर बसून का असेना पण खासदाराला लोकांसाठी केलेले नवनवीन ठराव मंजूर करणे किंवा त्यातील चुका दाखवण्याचे महत्वाचे काम करावयाचे असते. काही ठराव/बिल पास होण्याकरता जास्तीत जास्त खासदारांची मंजुरी लागते. हे काम संसदीय कामकाज म्हणून ग्राह्य धरले जाते.

 

 

२. सत्तेत असलेला खासदाराला त्यांच्या सरकारी कर्तव्यांची पूर्तता करणे गरजेचे असते. समजा एखादा खासदार रस्ते बांधणीच्या खात्यात असल्यास त्याची अंमलबजावणी ठरलेल्या प्लॅन प्रमाणे सुरळीत पाड पाडण्यास जबाबदार असतो. हाता खालील सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुद्धा व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी खासदारावर असते. एखादा खासदार विरोधी पक्षात असल्यास त्याने सरकारवर बारकाईने लक्ष ठेवणे, काही नवीन ठराव सुचवणे अपेक्षित असते. सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षाच्या थोडा अंकुश लोकशाहीला मजबुती देतो.

 

 

३. आपापल्या मतदार संघातील सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकणे आणि ती लोकसभेत प्रस्तुत करणे हे खासदारांचे आद्य कर्तव्य. ४. सरकारने नेमून दिलेल्या कामांच्या निधीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्याचा वापर योग्य तऱ्हेने, लोकांच्या हितासाठी करण्यास खासदार कटिबद्ध असतो.

 

 

५. कौन्सिल ऑफ मेंबर्स म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळात असलेल्या खासदारावर त्याच्या मतदार संघाच्या जबाबदारी बरोबर देशहिताचे एखादे खाते ही सुपूर्द केलेले असते. त्यामुळे अशा खासदारावर कामाचा दुप्पट भार असतो आणि ते काम सहजपणे पार पाडणे हे त्या खासदारांचे कौशल्य समजले जाते.

 

 

६. स्वतःच्या मतदार संघात काम करताना मोठ्या प्रमाणावरची (broader prospect) कामे हातावेगळी करणे हे खासदारांचे काम. म्हणजे शिक्षण, स्वास्थ्य, सोशल वेल्फेअर, इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारी स्कीम्स ची पूर्तता ह्या बाबींकडे खासदाराला लक्ष ठेवावे लागते.

 

तर मंडळी मतदान करणे इतकीच आपली जबाबदारी नसून पुढची ५ वर्षे आपल्या मतदार संघातल्या प्रत्येक सरकारी पुढाऱ्याकडे बारकाईने लक्ष देणे, त्यांना प्रश्न विचारणे, कामांसाठी पाठपुरावा करणे, खर्चायाचे हिशोब मागणे हे आपले देखील कर्तव्य आहे. फक्त MP निवडून दिला की काम झाले असे नव्हे. आपणही आपली कर्तव्ये पार पाडली तर अपण जाब विचारण्यास पात्र ठरतो आणि हीच खरी लोकशाही समजली जाते.

 

 

आपल्या मतदार संघातील मोठ्या समस्यांसाठी आपण खासदार निवडून देतो. बाकी इतर लोवर लेव्हलच्या समस्यांची जबाबदारी आमदार, नगरसेवक अशा राजकीय पातळीवर घेतली जाते. अर्थात जेव्हा पुढच्या राज्यस्तरीय निवडणका येतील तेव्हा त्यांचे रोल, त्यांची कर्तव्ये आम्ही तुम्हाला समजावून देऊच..!!

तो पर्यंत तुम्ही सध्या असलेल्या निवडणुका आणि तुमच्या उमेदवारां कडे लक्ष ठेवा आणि मतदारांनो.. चाणाक्ष पणे आपल्या मतदानाचा हक्क बजावा..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!