तुम्हाला माहिती आहे का..? ज्याच्या खरेपणाचे आपण दाखले देतो तो हरिश्चंद्र राजा देखील एकदा खोटे बोलला होता..

0

होय..!! हे खरंय.. तर मंडळी, राजा हरिश्चंद्र म्हणजे खरे पणाचे, प्रामाणिक पणाचे मूर्तिमंत उदाहरण.. हा असा राजा होता ज्याने खोटेपणाला आपल्या आयुष्यात थारा नाही दिला. आयुष्यभर खरे बोलून त्याने आपले आणि आपल्या कुटुंबाचेही आयुष्य पणाला लावले. सचोटीने वागण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. राजगादी, राज्य, बायको, मुलगा सगळेच त्याच्यापासून हळू हळू नियतीने काढून घेतले.

त्याची चांगलीच परीक्षा घेतली.. पण अशा राजाने देखील एकदा खोटे बोलण्याचे धाडस केलेले आहे.भागवत पुराणात ही कथा सांगितली जाते.. अघोरी असली तरी लोकांचा ह्यावर विश्वास मात्र आहे. ह्या कथेमार्फत आयुष्याचा धडा शिकवला जातो असे जाणकार मानतात. वाचा तर मग ही अजब कथा..

राजा हरिश्चंद्र आणि त्याच्या राणीला मुलं होत नव्हती तेव्हा राजाने वरूण देवतेची पूजा केली. वरुण देव राजावर अतिप्रसन्न झाले. त्यांनी राजाला वर मागण्यास सांगितले. राजाने लगेच एका पुत्राची मागणी केली आणि वरुण देवांना सांगितले की त्या पुत्राच्या नावे एक यज्ञ करून त्यात त्याची आहुती देऊन तो पुत्र तुम्हाला परत करुन टाकेन. वरुण देवांनी ही मागणी मान्य केली आणि त्वरित त्यांच्या आशीर्वादाने राणीला पुत्र रत्न झाले.. ह्याचे रोहित असे नामकरणही ही थाटामाटात करण्यात आले.

आपल्या लेकरावर राजाची माया जडली. त्याला वरुण देवांना दिलेल्या वचनाचा विसर पडला. मात्र वरुण देव मुलाची आहुती स्वीकारण्यास प्रकटले, तेव्हा मुलगा १० महिन्याचा झाल्यानंतर यज्ञ करून तुम्हाला अर्पण करतो असे राजाने वरूण देवांना सांगून काही काळासाठी परतवले.. त्यानंतर दात आल्यावर यज्ञ करतो, शिक्षण झाल्यावर करतो, मोठा झाल्यावर यज्ञ करतो असे बहाणे बनवून राजाने सतत वरूण देवांना झुलवत ठेवले.

शेवटी रोहित मोठा झाल्यावर त्याला सगळे सत्य समजले. त्याच्या जीवाला वडिलांकडे धोका आहे, कधीही त्याची आहुती दिली जाऊ शकते हे कळल्यावर मात्र स्वतःचा जीव वाचवायला, रोहित जंगलात पळून गेला. आपल्या राज्यपासून तो दूर राहू लागला.

इकडे राजाची नियत फिरली आहे आणि तो पुत्र प्रेमाखातर का असेना, पण चक्क खोटं बोलत आहे हे पुरते कळल्यावर मात्र वरुण देव राजा वर कोपले. सत्य पूजक राजा हरिश्चंद्र वरूण देवाच्या शापाने आजारी पडला.. रोहितला ही बातमी कळताच तो वडिलांकडे जाण्यास निघाला मात्र पुढची सहा वर्षे इंद्र देवाने त्याला जाण्यापासून रोखले.

सहा वर्षांनी जेव्हा रोहितने वडिलांकडे जाण्याचे ठरवले तेव्हा त्यांना शापातून मुक्त करण्यासाठी रोहितने अजितर्ग नावाच्या अत्यंत गरीब ब्राह्मणांकडून त्याचा मुलगा शुन:शेप ह्याला आहुतीसाठी विकत घेतले. शुन:शेप ची यज्ञातून आहुती दिल्यावर वरुण देव प्रसन्न झाले आणि पुत्रप्रेमात खोटे बोललेला राजा हरिश्चंद्र आजारातून बारा झाला. त्याला वरूण देवांनी माफ केले.

तर दोस्तांनो, परिस्थिती किंवा प्रेम कोणालाही खोटे बोलण्यास भाग पडू शकते ह्याचेच ही कथा उदाहरण असावे. मात्र सत्याची पूजा करणाऱ्या हरिश्चंद्र राजाच्या नावावर एक खोटे बोलण्याचा किस्सा मात्र नोंदला गेला हे खरे..!! नाही का..?!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!