ह्या धावपळीच्या जगात , शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या गोड आठवणी पार विसरून गेल्यात.

0

उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू झाल्या , आणि सगळी मुलं नवीन नवीन युनिफॉर्म घालून मोठ्या उत्साहात शाळेत जाताना बघितली की काही पालकांना तरी त्यांच्या शाळेतल्या दिवसांची आठवण झाल्याशिवाय रहात नसेल. खूप मज्जा मज्जा असायची ना?? पण आपण कधी मोठे झालो , कधी नोकरी व्यवसायात पडलो हे कळलंच नाही. आणि जी धावपळ सुरू झाली त्यात आपलं सगळं गमतीदार बालपण, सुट्टीतली मज्जा सगळं, सगळं पार विसरूनच गेलो ना आपण?

आयुष्यात इतकी मोठी धावपळ, इतक्या प्रकारचा जीवनाचा संघर्ष असेल ह्याची त्यावेळी कल्पना सुद्धा आली नव्हती ना? इतकं रम्य होतं ते बालपण, आणि प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी. त्यातल्या निदान ह्या आठ दहा गोष्टी तरी सगळ्यांच्या आठवणीत असतील. ज्या फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच आपल्याला उपभोगायचं पूर्ण स्वातंत्र्य असायचं, त्या गोष्टी करू नका, किंवा का करता असं कोणीही सांगत किंवा विचारत नव्हतं. अगदी मनसोक्त आनंद, आणि मजाच मजा असायची सगळी.

१- आज्जी आजोबांच्या घरी कधी एकदा जातोय अशी ओढ लागायची.  शाळेला कधी एकदा सुट्टी लागतीये असं होऊन जायचं, कारण एकदा का आज्जी आजोबांच्या गावी गेलो की पूर्ण स्वातंत्र्य. मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं ठिकाण म्हणजे आजोळ. सगळे हट्ट पूरे करणारं हक्काचं नातं म्हणजे आज्जी ,आजोबा. म्हणून त्यांच्याकडे जायची ही ओढ असायची.

२- शाळेला सुट्टी लागली की मित्रांबरोबर मनसोक्त खेळायचं. ही एक मनाला आनंद देणारी गोष्ट असायची. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत , अगदी अंधार पडेपर्यंत खेळायचं. कारण आता सुट्टी लागली , आता कोणी आपल्याला खळू नको, अभ्यास कर असं म्हणणार नाही हा आनंद असायचा.

३- काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायला ही सुट्टी फार हवी हवीशी वाटायची. म्हणजे कोणाला काही वाद्य शिकायची इच्छा असेल तर , किंवा कोणाला पोहायला शिकायचं असेल तर, किंवा चित्रकला, गायन , कराटे, असं काहीतरी शिकायचं असेल तर ह्याच सुट्टीत हे सगळं काही शिकायला मिळायचं.

४- दुपरच्यावेळेत बाहेर जास्त ऊन असेल तर घरात बसल्या बसल्या पत्ते, चेस, व्हिडीओ गेम्स, असले खेळ पाहिजे तितका वेळ मित्रांना घरी बोलवून खेळायला मज्जा यायची.

५- अगदी कोणी मित्र घरी येऊ शकले नाही तर घरात मस्त कॉमिक बुक्स वाचायचा मोठ्ठा टाइम पास करता यायचा. नाहीतर टी व्ही लावून घरात आपल्याला पाहिजे त्या चॅनेल वर मिकी माउस, टॉम अँड जेरी सारख्या कार्टून फिल्म बघायला मजा वाटायची. म्हणजे काय आपल्याला पाहिजे ते करायची ही सुट्टी असायची.

६- मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडणारी फेवरीट डिश आईला करून द्यायला सांगितली तर आई कधीच नाही म्हणणार नाही, आणि ती आपल्याला १००% खायला मिळणार ही खात्री असायची आणि आपण मागितल्यावर आपला हट्ट आई पुरवायची. कारण हीच वेळ असायची की काहीही खा, काहीही प्या, आई नाही म्हणायची नाही. खाण्या पिण्याची चंगळ असायची.

७- रात्री उशिरापर्यंत बहीण भावांशी मनसोक्त गप्पा, भेंड्या, गाणी, गोष्टी, कॅरम, खेळता यायचा. त्याला कुणाचंही बंधन नसायचं. पार डोळे मिटायला लागेपर्यंत हे चालायचं. घरात धुडगूस घातला जायचा.

८- कोणीतरी सकाळी लवकर उठून लांब फिरून यायचा बेत करायचा, मग बाकी छोटी मंडळी पण तयार व्हायची. जाता जाता रस्त्यात आंब्याचं झाड दिसलं की दगड मारून कैऱ्या पाडायच्या आणि त्या खायची मजा काही वेगळीच असायची ना? ९- सुट्टी म्हणजे सकाळी लवकर उठायची घाईच नाही. निवांत उठायचं, कारण शाळेत जायची काहीच धावपळ नाही , आवरा आवरी करायची नाही. कसली पळापळ नाही. सगळं कसं निवांत.

१०- सुट्टीत आजी आजोबांकडे जायचं मग नवीन नवीन कपडे, बूट , चप्पल अशी सगळीच खरेदी होते. मग सगळा उत्साहाच उत्साह. एकूण काय तर सगळं कसं खुशीचं वातावरण असतं. सगळे च खुश असतात. म्हणून उन्हाळ्याची सुट्टी कधी येते ह्याची सगळीच मुलं वाट बघत असतात. आनंद लुटायचा असतो . ह्याच सुट्टीत मुलं अगदी खुश होऊन जातात आणि परत नव्या जोमात पुढच्या वर्गातल्या अभ्यासाला सुरुवात करतात. अशी ही उन्हाळ्याची सुट्टी मुलांना हवीच.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!