महिला नागा साधू कशा बनतात माहीत आहे का..?? २०१९ च्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जाणून घ्या..

0

प्रयागराजला सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये नुकत्याच ६० महिलांना, नागा साध्वीची दीक्षा देण्यात आली. ह्याची बरीच चर्चा तर होत आहे. पण कोणत्या निष्कर्षांवर ह्या साध्वीना नागा साध्वी बनवून घेतले जाते ते मात्र कोणाला माहीत नसते. इच्छा झाली म्हणून साध्वीची दीक्षा घेतली असे होत नसते. खूप कठीण परीक्षा पास करावी लागते तेव्हाच आखाड्याचे मोठे साधू / साध्वी तुम्हाला दीक्षा देतात. बहोत पापड बेलने पडते है भाई..!! तर आज जाणून घेऊयात नागा साध्वी बनण्यासाठी काय काय करावे लागते.

१. ६ ते १२ वर्षे ब्रह्मचर्य पालन करणे: नागा साध्वी बनण्यास उत्सुक असलेल्या स्त्रियांना ६ ते १२ वर्षे सन्यासाश्रमात जगावे लागते. म्हणजेच संन्यासी बनून ब्रह्मचर्य पालन करावे लागते. नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांना भेटायला परवानगी नसते. राग लोभ द्वेष मोह मद मत्सर ह्या षड्रिपुंचा त्यागही अपेक्षित आहे. त्यानंतर दीक्षा देण्यास ह्या स्त्रिया योग्य आहेत की नाहीत हे त्यांचे गुरू ठरवतात.

२. महिलांच्या पूर्वायुष्या बद्दल माहिती काढली जाते: ज्या आखाड्याशी साध्वी बनण्यास उत्सुक असलेली महिला निगडित आहे, त्या आखाड्याचे साधू त्या महिलेचे पूर्वायुष्य तपासतात. त्यांच्या घरच्यांच्या बाबतीत माहिती जाणून घेतली जाते. कोणती कुकर्मे तर केली गेलेली नाहीत ना ह्याची विचारपूस होते.

३. जिवंतपणीच होते स्वतःचे पिंड दान: महिला नागा साधू बनणे म्हणजे जिवंतपणीच सर्व त्याग करणे आहे. ह्या महिलांना दीक्षा घेण्यापूर्वी स्वतःचे पिंड दान आणि तर्पण करावे लागते. पिंडदान आणि तर्पण, खरे तर माणसाच्या मृत्यू नंतर त्याचे नातेवाईक करतात. पण इथे स्वतःच करावे लागते. ह्याचाच अर्थ स्वतः वरची, देहावरची मोह माया सुद्धा सोडून द्यावी लागते.

४. ह्या स्त्रियांचे मुंडण होते: ज्या महिलेला दीक्षा मिळणार असते तिचे विधिवत मुंडण होते. ह्यातही सुंदर केसांवरील, स्वतःच्या सौंदर्यावरील मोह सुटावा अशी अपेक्षा असते. त्यांना दही, गोमूत्र, भस्म, चंदन आणि हळदीने शाही स्नान घातले जाते. ह्या स्नानानंतर ह्या साध्वीना रोज फक्त एकच वेळ जेवण्याची मुभा असते. म्हणजे अन्नावरची वासना सुद्धा सोडून द्यावी लागते.

५. साध्वीना खूप सन्मान मिळतो: वरील सगळे सोपस्कार झाल्यावर ह्या महिलांना दीक्षा त्यांच्या आखाड्याचे महामहिम, सगळ्यात उच्च महंत देतात. त्यानंतर ह्या स्त्रियांना ‘माता’ असेच संबोधले जाते. सगळेच साधू ह्या स्त्रियांना आईचा दर्जा आणि खूप सन्मान ही देतात.

ह्या सगळ्याच अर्थ असाच की सर्वसंग त्याग केल्यावर, परीक्षेत तावून सुलाखून निघाल्यावर, भरपूर तपश्चर्या झाल्यावरच महिलांना नाग साधू म्हणून दीक्षा मिळते. आयुष्यभर अन्न मिळेल ना मिळेल मात्र तपश्चर्या सोडता येत नाही. स्त्री असल्यामुळे वस्त्रे घालण्याची मुभा त्यांना असते. पण रंगीबेरंगी फॅशनचे छान छान कपडे वर्ज्य असतात. फक्त भगवी कफनी घालणे अनिवार्य असते. एरवी अज्ञात वासात राहून कुंभमेळ्याला मात्र उपस्थित राहावे लागते. किती खडतर आयुष्य आहे हे. पण करण्यास अत्यंत अवघड अशा सगळ्याच गोष्टींचा मनोभावे त्याग केल्यानंतर हे त्यांच्यासाठी हे सोपेच असते.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा..!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!