हा १३ वर्षाचा मुलगा शिकवतो चक्क IAS च्या विद्यार्थ्यांना !

0

आय ए एस व्हायचं म्हणजे खूप मोठे परिश्रम घेऊन दिली जाणारी परीक्षा. भले भले हुशार विद्यार्थी घाबरतात ह्या परीक्षेला. का घाबरतात हा अभ्यासक्रम पूर्ण करायला हे त्यांनाच ठाऊक असणार. कारण आपण तेवढे हुशार नाही म्हणून त्या अभ्यासक्रमकडे तिरक्या नजरेने सुध्दा पहायची भीती वाटते. डोक्यावरून जाणार सगळं, खात्री झालीये पक्की. ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा द्यायचा घाट घातला होता त्यांना अभ्यास करताना पाहिलंय, ‘तेथे पाहिजे जातीचे’. असं म्हणून आपली आपलीच समजूत घालून दुसरा सोपा अभ्यासक्रम कुठला आहे का ते पाहिलं आणि त्या रुळावर चाललेली गाडी ह्या रुळावर घेतली. पण नुकताच एक व्हिडिओ पहिला यू ट्यूब वर. आणि आश्चर्याचा मोठा धक्काच बसला की हो. हा धक्का कसला होता माहितीये? तुम्हाला पण मोठ्ठा धक्का बसेल बरं का.

एक १३ वर्ष वय असलेला छोटा मुलगा I A S च्या विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने शिकवत होता. होssss शिकवत होता, त्याच्या पेक्षा वयाने किती तरी मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवत होता. काय शिकवत होता ? भूगोल शिकवत होता भूगोल. ( Geography). संपूर्ण जगात असलेले देश, रस्ते , नद्या, समुद्र, कसे सहज लक्षात ठेवायचे ह्याच्या टिप्स देत होता हा छोटा टीचर. आणि त्या विद्यार्थ्यांना हे सगळं सहज समजत होतं. म्हणजे तो छोटा टीचर काय शिकला असेल? जो ह्या ‘आय ए एस’ च्या विद्यार्थ्यांना सहज शिकवू शकतो. हा छोटा टीचर आत्ता सध्या नववीत शिकतो आहे. मग तो कसाकाय ह्या आय ए एस च्या विद्यार्थ्यांना शिकवू शकेल? त्याची बुद्धिमत्ता अचाट असेल का? असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा राहील हे नक्की.

ह्या छोट्या टीचर चं नाव आहे अमरस्वस्तिक थोगिती. इयत्ता नववी मध्ये आत्ता शिकतो आहे. वय फक्त तेरा वर्ष. तेलंगणा मधलं एक मंचेरीयल नावाचं गाव आहे तिथला राहणारा हा मुलगा. त्याचे वडील शिक्षक आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी पासून हा मुलगा जगाच्या नकाशाशी खेळायचा, नाकाशातली सगळी शहरं , नद्या, रस्ते, रेल्वे , महामार्ग, देशांचे विविध आकार , जंगलं, समुद्र, बघून बघून आत्मसात करायला लागला. आणि वयाच्या १० वर्षी आपले वडील जसे शिकवतात तशीच नक्कल करायला लागला.

वडील सुद्धा त्याला त्यात साथ करत होते. आणि एक दिवस वडील नसताना हा छोटा ‘अमर’ नकाशा वर बोट ठेऊन खोट्या खोट्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याच्या आईने त्याचा संपूर्ण व्हिडिओच तयार केला. आणि हा व्हिडीओ त्यांच्या मित्रपरिवारात , नातेवाईकांमध्ये दाखवला. आणि त्या सुंदर व्हिडिओतल्या ह्या छोट्या टीचर चे सगळ्यांनी कौतुक केलं. २/३ वर्षात ‘अमर’ चांगलाच तयार झाला, आणि तो त्याच्या टिप्स इतरांना द्यायला लागला.

मुलांना त्याचा फायदा झाला. ह्याच सगळ्या टिप्स मुळे त्याला संपूर्ण भूगोल कोणत्याही वर्गातल्या मुलांना शिकवता यायला लागला. त्याचा ह्यावर आणखी चांगला व्हिडीओ तयार केला गेला आणि तो ह्या सगळ्या IAS च्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलाच मार्गदर्शक ठरला. हाच व्हिडीओ नंतर “Learn with Amar ” ह्या नावाने यू ट्यूब वर शेअर केला. लोकांनी त्या व्हिडीओ ला खूप मोठया प्रमाणावर पसंती दिली. मग काय नंतर अमर ने बरेच व्हिडीओ तयार केले आणि आज हा अमर अनेक यू ट्युबर प्रमाणेच पण सगळ्यात लहान वयाचा यू ट्युबर झाला आहे. ह्याचे आज दोन लाखापेक्षा जास्त सबस्क्रयबर आहेत.

शनिवार, रविवार ह्या शाळेच्या सुट्टीच्या दिवशी अमर हे व्हिडीओ तयार करतो आणि आपली शाळा, अभ्यास सांभाळून तो आता स्वतःच्या यू ट्यूब चॅनलवर हे व्हिडीओ पोस्ट करतो. आणि ह्यातून तो IAS च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे . त्याचे वडील ‘गोवर्धन आचार्य थोगिती’ त्याच्या ह्या प्रगती बद्दल बोलताना म्हणतात की त्याच्या लहानपणापासूनच त्याची आकलन शक्ती (Grasping power) खूप जोरदार असल्याचं जाणवलं म्हणून मी त्याला ह्या गोष्टीचं थोडं मार्गदर्शन केलं तर आता तो स्वतःच अनेक लोकांचा मार्गदर्शक ठरला आहे.

‘ अमर च्या मुलाखतीत अमर म्हणतो की त्याला पुढे IAS ऑफिसरच व्हायचं आहे , आणि देशाची सेवा करायची आहे. तो म्हणतो की आपल्या देशात खूप कायदे आहेत पण लोक ते कायदे नीट पाळत नाहीत. मी ऑफिसर झाल्यावर ते सगळे कायदे लोकांना समजावून सांगीन आणि सगळे लोक ते पाळतील ह्या साठी प्रयत्न करीन . हा छोटा टीचर आता आणखी काही प्रगती करून दाखवणार आहे आणि ती म्हणजे त्याचं चॅनेल तो आणखी मोठं करणार आहे.

त्यात अर्थशास्त्र (Economics) आणि राज्य शास्त्र (Political Science) ह्या दोन्ही विषयांच्या टिप्स तयार करून हे विषय सगळ्यांना आणखी सोपे करून द्यायचं काम करणार आहे. जबरदस्त आत्मविश्वास आणि त्याला अफाट आकलन शक्ती ची जोड ह्यामुळे हा छोटा टीचर काहीही करू शकेल ह्याची खात्री कोणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. असा गुरू जर मिळत असेल तर I A S चा अभ्यास करणं किती सोपं होईल आणि ह्या गुरुकडे पाहून आतातरी कोणी ह्या परीक्षेला घाबरणार नाही.  ‘मोठयांच्या ह्या छोट्या गुरूला शतशः प्रणाम.’

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!