तरूणपणी केलेल्या सेवेची म्हातारपणात होणार अशी परतफेड ?

0

‘टाईम बँक ‘ एक आगळी वेगळी संकल्पना. आपणच आपल्या वृध्दापकाळासाठी केलेली, आपल्याच सेवेची बचत, जी जमा होते टाईम बँकेत.
आहे ना विचार करायला लावणारी संकल्पना. ही संकल्पना राबवली जात आहे, स्विक्झरलॅन्डमधे. ही ‘टाईम बँक ‘आहे तरी काय ? आणि तिचे कार्य चालते तरी कसे…? हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करताच, उदाहरणादाखल एक घटना समोर आली.

स्विक्झरलॅन्डमधिल एक मध्यमवयिन स्त्री उंचावरील काही काढण्यासाठी स्टुलावर चढलेली असताना तोल जाऊन पडली, आणि तिचे मांडीचे हाड मोडले.पण या अपघाताची काळजी करायची तिला मुळीच गरज नव्हती. पुढच्या काही तासात टाईम बँकेतुन काही सेवेकरी हजार झाले. या सेवेकर्यानी महिनाभर त्या स्त्रीच्या उपचारांपासुन, ते तिच्या घरातील स्वयंपाक बनवण्यापर्य॔त, सर्व जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पार पाडली.

तिची छान काळजी घेऊन तिच्याशी गप्पा मारत तिला आनंदी ठेवण्याचाही प्रयत्न केला.  कोण होते हे टाईम बँकेचे सेेवेकरी ? आणि त्यांनी का बरे केली या स्त्रीची इतकी उत्तम सेवा ?  मुळात ‘टाईम बँक ‘ही संकल्पना प्रत्यक्षात आणली स्वीस सरकारने, एक जनहितार्थ कार्यक्रम म्हणुन. या संकल्पनेमागील विचार असा, की. जेव्हा एखादी व्यक्ती सुदृढपणे तारुण्यात असते, तेव्हा ती आपल्यापेक्षा वृध्द, थकलेल्या व्यक्तींची सेवा, जमेल तशी करीत राहते.

नंतरच्या आयुष्यात हीच तरुण व्यक्ती, जेव्हा वृध्द होते, तेव्हा किंवा अशाच प्रकारच्या सेवेची तिला गरज पडते, त्यावेळी, तिने पुर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणुन तिलाही अशाच प्रकारची सेवा मिळते. कारण, तरुणपणी तिने सेवेकरी म्हणून, जितकी सेवा केलेली असते, ती सगळी सेवा, टाईम बँकेत नोंदणी स्वरुपात जमा होते. अशी ही तिच्याच सेवेची बचत, तिला तिच्या गरजेला नव्या सेवेकर्यांच्या सहाय्याने उपयोगी पडते.

सेवेकरी व्यक्ती मात्र सुदृढ, संवेदनशील व प्रेमळ असावी लागते. ज्या वृध्दांना सेवेची अपेक्षा असते, त्यांची सेवा करण्याची संधी इच्छुक तरुणांना मिळू शकते. सेवेकर्यानी केवेली सारी सेवा टाईम बँकेच्या सेवा खात्यात साठवली जाते.अशा प्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर, त्या सेवेची गणना करुन त्याना टाईम बँक कार्ड दिले जाते. जेव्हा सेवेकरी वृध्द होईल, तेव्हा त्या टाईम कार्डाची तपासणी होऊन त्यांच्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली जाते.

सध्या स्विक्झरलन्डमधे ‘टाईम बॅक’ हा विषय सर्वमान्य झाला आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी या संकल्पनेत सहभाग घेतला आहे. भारतातही अशी संकल्पना राबविण्याबाबत काहींनी प्रयत्न केले, परंतु कोणत्याही विधायक कार्यासाठी सर्वतोपरी सरकारवरच अवलंबुन रहाण्याच्या इथल्या मानसिकतेमुळे, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली नाही.

आपल्या भारतियांनी या संकल्पनेवर पुन्हा एकदा गांभिर्याने विचार करुन, ती राबविण्याबाबत विचार केला पाहिजे, आणि तरुण पिढीने तो आमलात आणला पाहिजे. ज्यायोगे भारतातील जेष्ठ नागरिकांचा वृध्दापकाळ मानाचा व सुखकर होऊ शकेल, शिवाय ज्या तरुणांची टाईम बँकेत सेवा जमा झाली असेल त्यांना या सेवा बचतीमुळे त्यांच्या वृध्दापकाळाची काळजी करण्याचीही गरज उरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!