जेंव्हा लोकप्रिय कलाकार राजकारणात येतात तेंव्हा काय परिणाम होतात पहा !

0

आजकाल कलाकार सुद्धा राजकारणात मोठ्या प्रमाणात उतरायला लागलेत. पण हे राजकारण त्यांच्या रक्तातच असतं का स्क्रिप्ट घेऊन तयार केलेलं असतं हे मुरलेल्या मतदाराला सहज कळतं, हे कदाचित त्या कलाकारांना कळत नसावं, कारण काही कलाकार आता आपल्याला काही काम मिळत नाही म्हणून राजकारणात येतात, तर काही खूप कळतंय असं दाखवून पार्ट टाइम राजकारण करतात, काहींना तर राजकारणाचा गंध पण नसतो, पण लोकांनी ओढलं म्हणून राजकारण करायला लागतात.

काहींना सहानुभूती मिळते म्हणून राजकारण करतात. अशी अनेक कारणे आहेत ह्या कलाकारांनी राजकारणात प्रवेश करण्याची. आता कलाकारांनी राजकारणात पडावं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखादी भूमिका सतत करून एखाद्याला प्रेक्षक खूप डोक्यावर घेतात. कारण त्या भूमिकेला साजेसा चेहेरा, हावभाव, शरीर यष्टी त्या कलाकाराला लाभलेली असते,त्यामुळे ती भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडायला लागते, लोक त्या कलाकाराचे फॅन होतात.

हेच फॅन्स कलाकारांना निवडणुकीत निवडून देऊ शकतात का ? आता राजकारणातले कार्यकर्ते आणि कलाकारांचे चाहते हे एकच असतात का? हा एक प्रश्न आपल्या सारख्या लोकांना नेहमी सतावत असतो. कलाकाराला असं वाटत असेल की आपले खूप चाहते आहेत मग आपण राजकारणात सुद्धा यशस्वी होऊ म्हणून अनेक कलाकार राजकारणात येतात. पण त्यांना त्यावेळी त्यांच्या पक्षाची संपूर्ण माहिती असतेच असं नाही.

काही जुने कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या आधीपासून राजकारणात असतात, हे सगळ्यांच्याच लक्षात येत असेल का नाही देवाला ठाऊक पण कधी विरोध, कधी प्रेम, तर कधी वेगळाच परिणाम दिसायला लागतो. त्याच कलाकाराचे चाहते नाराज होऊ शकतात, कारण चाहते वेगळ्या विचारांचे असू शकतात. असेच एक कलाकार म्हणून खूप गाजले , यशस्वी झाले, त्याचे असंख्य चाहते सुद्धा तयार झाले.

त्यांनी जी भूमिका छोट्या पडद्यावर साकारली तिला प्रेक्षाकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्या जोरावर त्यांनी राजकारणात मोठ्या धूम धडाक्यात प्रवेश केला. आणि त्यांची कलाकार म्हणून वाढलेली लोकप्रियता राजकारणात सुद्धा यश देईल अशी आशा घेऊन उत्साहात निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकलं. ही कलाकार व्यक्ती म्हणजे डॉ. अमोल कोल्हे.

पेशाने डॉक्टर, पण छत्रपती शिवाजी,आणि संभाजी महाराज ह्यांच्या भूमिकेला साजेसा चेहरा असल्यामुळे वैद्यकीय व्यवसाय न करता अमोल कोल्हे गेल्या काही वर्षात ह्या दोन भूमिका केल्यामुळे एकदम नावाजले गेले. नुसते नावाजले नाही तर लोकांच्या गळ्यातले ताईत बनले. आवर्जून त्यांची टी व्ही वरची मालिका लोक बघू लागले.

लोकप्रियता वाढत गेली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांना राजकारणात उडी घ्यायची इच्छा झाली. ज्या भूमिका अमोल कोल्हे ह्यांनी उत्कृष्ट वठवल्या त्या भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्यांना दैवत मानणारे अमोल कोल्हे ह्यांचे चाहते झाले. आणि अमोल कोल्हे ह्यांनी त्याच काळात राजकारणात उडी घेतली. कला आणि राजकारण ह्यांचे गणित जमायला सगळ्याच बाजूने होकार असायला लागतो. मग चांगली घोडदौड चालू होते.

पण अमोल कोल्हे ह्यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांचे असंख्य चाहते इतके नाराज झाले की त्यांनी टी व्ही वर चालू असलेली अमोल कोल्हे यांची सिरीयल पाहायला सुद्धा नकार दिला, काही लोकांनी तर त्यांचं नाव सुद्धा घेणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली. म्हणजे कलाकारांची लोकप्रियता ही राजकारणात प्रवेश केल्यावर एकदम खाली येते ह्याचा अनुभव महाराष्ट्राला आला.

अनेक लोक त्यांच्यावर टीका सुद्धा करायला लागले. अनेकांनी त्यांना पाठिंबा द्यायला नकार दिला. अनेक लोक तर आता त्यांच्या विरोधात उभे राहिलेत, त्यांचा हा निर्णय चुकीचा आहे असं स्पष्ट शब्दात बोलायला लागले. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना घेतलेला हा निर्णय अमोल कोल्हे यांना घातक ठरेल की काय असं वातावरण तयार झालं. पण निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. पुढे त्यांना आपली वाटचाल करायची आहे. त्यामुळे तो त्यांना लखलाभ होवो अशी प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिली.

डॉ. अमोल कोल्हे ह्यांनी आपले स्वतःचे घर विकून संभाजी महाराजांची सिरीयल पुढे चालू ठेवली अशी बातमी काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केली होती.त्यामुळे त्यांच्या ह्या कामाला महाराष्ट्रातून मोठी सहानुभूती मिळाली. पण आता त्यांचे काही चाहते त्यांच्या ह्या बातमी चा विरोध करायला लागले कारण लोकसभेला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नामांकन अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. ती खूप मोठी असल्यामुळे लोक त्यांना मिळलेली सहानुभूती योग्य नाही असेही म्हणतात.

त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेचार कोटींची आहे, साडेसहा एकर जमीन त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या वाहनांची किंमत २४ लाख इतकी आहे. साडे दहा लाखांचे दागिने आहेत, शेअर्स, पोस्टखात्यात गुंतवणूक ५७ लाखांची आहे, वैयक्तिक कर्ज ५० लाख आणि गृह कर्ज १५ लाख आहे. एवढी संपत्ती त्याच्याकडे असताना त्यांनी घर विकून सिरीयल चालू ठेवली अशी बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यांना लोकांची त्याबद्दल सहानुभूती मिळाली. हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते आहे.

म्हणजे कलाकाराने राजकारणात उतरल्यावर अशा गोष्टींचा ही सामना त्यांना करावा लागू शकतो. त्यामुळे कलाकारांनी राजकारणात उतरताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच कधी राजकारणात उतरायचं, कोणत्या पार्टीत गेल्यावर त्यांचे चाहते नाराज होणार नाहीत आणि आपली लोकप्रियता कशी अबाधित राहील ह्याचा विचार करूनच राजकारणात उतरायला लागेल. नाहीतर कलाकारांना उंच शिखरावरून खाली खेचायला त्यांचे चाहतेच कारणीभूत ठरू शकतात हे महाराष्ट्रात निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!