शिवशंकराच्या पिंडीवर बेलाचे पानच का वाहतात ? जाणून घ्या या मागचं कारण !

0

महाशिवरात्रीचा उत्साह काही औरच असतो. सगळ्यांकडे ह्या उत्सवाची जंगी तयारीच असते म्हणा ना.. पूजेची तयारी, देवळात अभिषेकाची तयारी आणि अखंड उपवासाची तयारी.. महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन मोठ्या भक्तिभावाने भाविक शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात आणि शिवनाम घेत तितकीच बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने वाहतात. हिंदू धर्मात प्रत्येक देवाला वाहण्यासाठी वेगवेगळ्या फुलांची महती सांगितली जाते. जसे गणपतीला लाल फुल तर कृष्णाला तुळस आणि शिवाला बेल..!! ह्यांची अदलाबदली होत नसते बरं..!!

तर मंडळी आज महाशिवरात्री निमित्त ह्या भोळ्या शंकराला बिल्वपत्रच का प्रिय आहे ह्याची आख्यायिका आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. तर जाणून घेऊयात काय गोष्ट आहे ह्या मागे.. एकदा नारदमुनी भगवान शंकरांना विचारतात, “देवा, आज मला जाणूनच घ्यायचे आहे की तुम्हाला भक्तांनी वाहिलेले बेलाचे पानच का आवडते?” ह्यावर शंकर म्हणाले, ” मुनिवर, माझ्या भक्तांनी माझ्यावर केले अपार प्रेम आणि श्रद्धाच खरे तर मला खूप भावते.

पण जल आणि बेल जो मला अर्पण करतो त्या भक्ताला मी इथे आपल्या लोकांत स्थान देतो.” ह्या नंतर नारदमुनीं सारखीच देवी पार्वतीना देखील खूप उत्सुकता वाटली ह्या बेलपाना बद्दल. पार्वती देवीदेखील शंकराकडे बेलपान आवडण्यामागची संपूर्ण गोष्ट सांगण्याची याचना करतात.

शंकर सांगतात हे देवी हे बिल्वपत्र माझ्या जटांसारखे आहे.. ह्याचे त्रिदल म्हणजेच तीन पाने जणू ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहेत आणि त्यांच्या दांड्या ह्या संपूर्ण शास्त्रा समान आहेत. हे बेलपान वृक्ष जणू पृथ्वीवरचा कल्पवृक्षच जो ब्रह्मा, विष्णू आणि शिव स्वरूप आहे. इतकेच काय तर स्वतः देवी लक्ष्मीनी सुद्धा बिल्ववृक्षाच्या रुपात जन्म घेतला होता.

आता मात्र पार्वती देवीला राहवले नाही. लक्ष्मी देवींनी का असे रूप घेतले ह्यावर शंकरांनी एक कथा सांगण्यास सुरुवात केली. सत्ययुगात ज्योतिरुपात माझे रामेश्वर लिंग अस्तित्वात होते. ज्याची नियमित पूजा देवांनी केली. माझ्या आशीर्वादाने वाग्देवीची निर्मिती झाली आणि ती सगळ्यांना प्रिय झाली. भगवान विष्णूंना प्रिय झालेली वाग्देवी लक्ष्मी देवींना रुचली नाही. विष्णू भागवानांच्या हृदयात कायम मलाच स्थान असावे ह्यासाठी त्यांनी माझी तपश्चर्या चालू केली.

शैल पर्वतावर शिवलिंग स्थापून लक्ष्मीदेवी उग्र तापश्चर्येस बसल्या आणि कित्येक वर्षांच्या तापश्चर्येमुळे त्यांच्या भोवती वृक्षरूप धारण झाले. त्यांच्या वृक्षरूपातून पडणाऱ्या पुष्प आणि पत्रांमुळे शिवलिंगावर अभिषेक होऊ लागला. १ कोटी वर्षांच्या ह्या तापश्चर्येनंतर त्यांना माझा अनुग्रह आणि माझ्या आशीर्वाद मिळाला. त्यांनी श्रीहरींच्या हृदयात फक्त त्यांनाच स्थान असावे अशी मागणी केली. मात्र श्रीहरींच्या मनात आणि हृदयात देवी लक्ष्मीशिवाय दुसरे कोणीच नाही ह्याची खात्री मी त्यांना दिली त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन कायम विष्णू हृदयात विहार करू लागल्या.

त्यांच्या बिल्ववृक्ष रूपाने त्यांनी माझ्या शिवलिंगाची कायम पूजाअर्चा केली त्यामुळेच हा बिल्व मला खूप प्रिय झाला आहे. मी सुद्धा कायम ह्या बिल्व वृक्षाच्या आश्रयाला राहतो. हा बिल्व वृक्ष म्हणजेच शिव.. त्याच्या पत्राने माझे पूजन करणारा भक्त हा माझा प्रिय भक्त बनतो. अशा भक्तावर लक्ष्मी देवी सुद्धा प्रसन्न राहतात. म्हणूनच माझ्या भक्तांनी माझी पूजा कायम ह्याच बेल पत्राने करावी, त्यांना मोक्ष देऊन मी आपल्या लोकांत स्थान देतो. ही कथा ऐकून पार्वती देवी ही सुखावल्या..!!

तर मंडळी तुम्हाला हो आख्यायिका कशी वाटली..? आपण जे बिल्व पत्र वाहतो त्याचे शिवशंकरांना किती महत्व आहे हे तुम्हाला आज समजलेच असेल. तर ह्या भोळ्या सांबाला प्रसन्न करून घेण्याचा जणू सोपा उपायच आज तुमच्या पुढे आम्ही आणला आहे. ह्या माहितीला भरपूर शेअर करा आणि तुमच्या इतर शिवभक्त बंधू भगिनींनाही सांगा..!! जय बम भोले.. हर हर महादेव..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!