ही आहेत अनोखी क्षेत्र जिथे स्त्रियांना काम करताना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल..

0

‘नाटक सिनेमात तर माझ्या घरचे जाऊच देणार नाहीत..’  ‘हो ना, मला पायलट बनायचं आहे पण घरचे, गुमान बी एड करून टीचर हो म्हणून मागे लागलेत..’ ‘मी मात्र नशीबवान आहे हं.. अमेरिकेत जाऊन, एकटी राहून मी डायरेक्शन चा कोर्स करू शकणार आहे..’ अशा चर्चा गर्ल्स गँग मध्ये आपण कायम ऐकतो. पदवी नंतर मुलीने काय करिअर निवडावे ह्यावर फॅमिली व्हाट्स ऍप ग्रुप वर सल्ल्यांचा पाऊस पडतो. सोप्पी आणि चांगला पैसा मिळवून देणारी करिअर्स सगळेच सुचवू लागतात.

आई वडिलांनी, सासरच्यांनी, समाजानी एक सीमा रेषा आखून दिलेलीच असते. त्या सीमेरेषे पलीकडे तर स्त्रीच्या ‘मनाला’ सुद्धा जायला बंदी असते. तर प्रत्यक्षात कोण जाईल..!! नाहीतर ‘नसतं खूळ डोक्यातून काढून टाका..!!’ अशा प्रेमळ धमक्याही मिळतात. पण ह्या सगळ्यातून किंवा भौगोलिक, आर्थिक परिस्थितीतून एक वेगळेच कार्यक्षेत्र निवडणाऱ्या स्त्रिया मात्र कमाल करतात. त्यांना घडवणारे पुष्कळ असतात पण त्या धैर्याने आपले यश गाठतात.

आज ८ मार्च , म्हणजेच ‘जागतिक महिलादिन’ निमित्त काही मैत्रिणींना भेटुयात. पुरुषांच्या क्षेत्रात तिथे स्त्रिया असूच शकत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा कणखरपणे पाय रोवून उभ्या आहेत.. वाचा तर मग त्यांची अद्भुत कथा..

१. ट्रक मेकॅनिक : स्वतःच्या सायकल किंवा स्कुटी मध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे हे देखील सांगू ना शकणाऱ्या स्त्रिया आता स्वतः कारचे देखील पंक्चर काढू शकतात. अशाच अनोख्या क्षेत्रात शांतीदेवींनी आपला जम बसवलं आहे. कारच काय तर ट्रक सुद्धा दुरुस्त करू शकतात. गम्मत म्हणजे तिथल्या पुरुष मेकॅनिक पेक्षा शांतीदेवी खूप चांगले काम करतात असे त्या स्वतः आत्मविश्वासाने सांगतात.

दिल्ली च्या एका चहाच्या टपरीवर काम करता करता त्यांनी स्वतःच्या नवऱ्याकडून हे काम शिकून घेतले. पण लोकांना त्यांच्यावर सुरुवातीला विश्वास नसे. एक महिला हे काम कसे करू शकेल..? मात्र आता दिवसाला १२ – १५ पंक्चर त्या एकट्याने काढतात. गेली २० वर्षे त्या हे काम करत आहेत आणि आता शाळा कॉलेजेस मध्ये त्या ‘मोटिवेशनल स्पीचेस’ सुद्धा देतात..!!

२. लेडी बाऊन्सर : सोप्या शब्दात सांगायचे तर लेडी बाऊन्सर म्हणजे महिला बॉडी गार्ड. क्लब, पब्स आशा ठिकाणी बाऊन्सर्स सुरक्षेचे काम करतात. बलदंड आणि हट्टे कट्टे बाऊन्सर्स भल्याभल्यांची पळताभुई थोडी करतात. पण ह्या पुरुषांच्या क्षेत्रात आता स्त्रीयांनी देखील पाऊल ठेवले आहे. २००८ च्या बीबीसी च्या रिपोर्ट नुसार चंदीगडची अमनदीप कौर ही भारतातली पहिली महिला बाऊन्सर आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीची मेहेरुंनीसा ही देखील ह्याच क्षेत्रात उतरली. लोकांचे तिरस्कार आणि इतर अडचणींवर मात करत तिने स्वतःचे एक स्थान ह्या आगळ्या वेगळ्या क्षेत्रात निर्माण केले आहे.

३. स्वीग्गी फूड डिलिव्हरी गर्ल : ह्या क्षेत्रात फक्त पुरुषांचा दबदबा आहे. रस्त्यातून सुसाट जाणारे हे डिलिव्हरी बॉय आपल्याला दिसताच असतात. मात्र स्वीग्गी ने स्वतःच एक वेगळे पाऊल उचलले आहे. आता डिलिव्हरी वाले भैय्या नाही डिलिव्हरी वाल्या दीदी सुद्धा दिसू लागल्या आहेत. स्वीग्गी टीमच्या महिला मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, कोची आणि कलकत्त्याला सुद्धा दिसू लागल्या आहेत.

४. महिला बस ड्राईव्हर : भारतातीलच नव्हे तर एशिया मधली पहिला बस ड्रायव्हर ठरली आहे वसंथा कुमारी..!! स्वतःचे घर चालवण्याकरता वसंथा कुमारीने ड्रायव्हिंग शिकून घेतले. १९९३ पासून ती बस ड्रायव्हरचे काम करत आहे. आता हे फक्त काम नसून त्यांची खास आवड बनलेली आहे.

५. महिला बॉडी बिल्डर : परदेशात ह्या क्षेत्रात भरपूर स्त्रिया दिसून येतील पण भारतात स्त्रिया ह्या नाजूकच असाव्यात अशी भ्रामक कल्पना समाजात आहे. त्यामुळे महिला पहिलवान, महिला बॉडी बिल्डर अशी कामे स्त्रियांच्या वाटेला येताच नाहीत. पण हा स्टीरिओटाईप खोदून काढत अश्विनी वासकर ही भारताची पहिली महिला बॉडी बिल्डर बनली आहे. स्वतःच्या स्थूल शरीराला वैतागून तिने जिम सुरू केले. बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेबद्दल तिच्या कानावर बातमी आली. त्यात भाग घेण्यासाठी तिने वजन घटवण्यास सुरुवात केली आणि स्नायूंना मजबुती देणारे व्यायाम चालू केले. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता अपार मेहनतीने अश्विनीने महिला बॉडी बिल्डर बनण्याचा मान मिळवला आहे.

६. रेल्वे महिला क्रू : भारताला अभिमान वाटेल अशी घटना काही वर्षांपूर्वी महिला दिन घडली. भारतातील एक रेल्वे सगळ्या महिलांच्या चमूने चालवली. त्यात लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, गार्ड, तिकीट चेकर आशा सगळ्या महिलाच होत्या. रांची पासून लातेहार पर्यंत १११ किमी ही पॅसेंजर ट्रेन चालवली गेली. ज्यात आर पी एफ सुद्धा एक महिलाच होती.

ही उदाहरणं बघता स्त्रियांसाठी कोणतेच क्षेत्र निषिद्ध नाही. त्यांनी ठरवलं तर काहीही करू शकतात हेच ह्या स्त्रियांच्या उदाहरणांवरून दिसून येते. आजच्या महिला दिनानिमित्त अशा सगळ्याच कर्तृत्ववान स्त्रियांना स्टार मराठीचा सलाम..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!