‘झी टॉकीज’च्या स्क्रीनवर अवतरणार ‘पाटील’ !

0

झी टॉकीज या मराठी वाहिनीवर, गेली अनेक वर्षे दर्जेदार मराठी चित्रपटांची रेलचेल असते. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळेच आज ही वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांची पहिली पसंती असलेल्या या वाहिनीवर, एखाद्या चित्रपटाचा प्रीमियर कधी होणार याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते.

येत्या, रविवारी, १४ एप्रिल रोजी ‘पाटील’ या चित्रपटाचा प्रीमियर ‘झी टॉकीज’ वाहिनीवर होणार आहे. नरेंद्र देशमुख आणि भाग्यश्री मोटे या कलाकारांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. कृष्णा व पुष्पा यांची प्रेमकहाणी व कृष्णाच्या यशस्वी जीवनाची ही कथा आहे. येत्या रविवारी १४ एप्रिलला, दुपारी १२ व संध्याकाळी ७ वाजता ‘पाटील’ हा चित्रपट ‘झी टॉकीज’वर प्रदर्शित होईल.

चित्रपटाचं कथानक कृष्णा व पुष्पा यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कृष्णाच्या घरच्यांना मान्य नसतं. या विरोधामुळे, त्या दोघांचं आणि कुटुंबाचं आयुष्य कसं वळण घेतं, ते या कथेत पाहायला मिळेल. घडणाऱ्या घटनांमुळे कृष्णाला आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. आई-वडिलांच्या मनाविरुद्ध, आपलं घर सोडून तो मुंबईला जाण्याचा निर्णय घेतो. मुंबईत आल्यावर आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन तो भरपूर मेहनत करतो.

अंगावर पडेल ते काम करत वाटचाल करणारा कृष्णा प्रशासकीय सेवेतील जिल्हाधिकारी कसा बनतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतो. यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, प्रसंगी यातना सहन करून पुढे वाटचाल करावी लागते याची जाणीव चित्रपट करून देतो. मनोरंजन करत असताना प्रेरितही करू शकणारा हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने अवश्य पाहावा असा आहे.

रविवारी १४ एप्रिल रोजी, ‘झी टॉकीज’वर पाहायला विसरू नका, ‘पाटील’; दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!