गजर सुरक्षिततेचा ! महाराष्ट्राला कीर्तनाची परंपरा खूप जुन्या काळापासून लाभलेली आहे.

महाराष्ट्राला कीर्तनाची परंपरा खूप जुन्या काळापासून लाभलेली आहे. संतपरंपरेसोबत ही परंपरा चालत आली आहे. भजन-कीर्तन म्हंटलं, की रसिकांना आठवण होते, ती ‘झी टॉकीज’वरील ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाची! रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला हा कार्यक्रम, यशाच्या एका नव्या शिखरावर विराजमान झाला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून कीर्तन छोट्या पडद्यावर आलं आणि समाजप्रबोधनाच्या या प्रवासात या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक कार्तिकी गायकवाड आणि दीप्ती भागवत यांनी देखील त्यांच्या निवेदनाने योगदान दिलं. लॉकडाऊनच्या काळात या कार्यक्रमाचे जुने भाग प्रेक्षकांच्या भेटीस येतो होते पण लवकरच नवीन भाग प्रेक्षकांना झी टॉकीजवर पाहायला मिळतील. या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु झालं असून. दीप्ती भागवत हिने परळी (बीड) येथे चित्रीकरण देखील केलं. प्रेक्षकांना नवीन भाग बघता यावे म्हणून या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम प्रवास करतेय पण त्याच सोबत योग्य ती खबरदारी देखील बाळगतेय. सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊन या कार्यक्रमाचं चित्रीकरण होतंय.

याबद्दल बोलताना सुत्रसंचालिका दीप्ती भागवत म्हणाली, “नुकतंच मी ३ दिवसाच्या शेड्युलमध्ये परळी वैजनाथ येथे गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं शूटिंग केलं. सध्या शूटिंग दरम्यान खूप बदल घडले आहेत. पूर्वी जितकं मोकळं वातावरण होतं आता तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे अगदी मुंबई पासून परळी पर्यंत जाण्यासाठी लागणारा इ-पास, त्यासाठी मला डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागलं होतं आणि बऱ्याच फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागल्या. त्यानंतर परळीला पोहोचल्यावर देखील शूटिंग करताना आम्ही बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली. शूटिंग सुरु करायच्या आधी आमचं टेम्परेचर चेक केलं जातं, संपूर्ण टीम पूर्णवेळ मास्क लावून असते, आम्ही जिथे जिथे शूटिंगला जाऊ ती जागा सतत सॅनिटाईज केली जाते. टेक्निकल टीम देखील संपूर्ण काळजी घेते.

ते ग्लव्स आणि चष्मा लावूनच काम करतात. त्यामुळे शूटिंग करताना सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेतली जाते. घरापासून इतक्या लांब येऊन शूटिंग करताना घरच्यांना थोडी धाकधूक होती पण हा कार्यक्रम अध्यात्मिक आहे, प्रत्यक्ष परमेश्वर भक्तीशी जोडणारा आहे आणि चित्रीकरणात संपूर्ण काळजी घेतली जाते त्यामुळे हि भीती कमी झाली. गजर कीर्तनाचा या कार्यक्रमातून सातत्याने सकारात्मक विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात, त्यामुळे अनेकाकांना हा कार्यक्रम बघितल्यानंतर या संकट काळात उभारी मिळते. माझी ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे कि हे संकट लवकरात लवकर टळो. परंतु सध्याच्या काळात सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आपण आपली काळजी नीट घेतली तरच पर्यायाने आपण आपल्या कुटुंबाची आणि देशाची काळजी घेऊ.”